बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांची आश्रमशाळेला भेट

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांची आश्रमशाळेला भेट

शहापूर । वर्षश्राद्धाचे जेवण करून 109 विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे चर्चेत आलेल्या तालुक्यातील भातसई येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेला महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या नीलिमा चव्हाण यांनी भेट देऊन आश्रमशाळा आणि वसतिगृहाची पाहणी केली. शाळेमध्ये वर्गावर जाऊन तसेच काही विद्यार्थ्यांबरोबर वैयक्तिक संवाद साधत चौकशी केली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतून दिले जाणारे जेवण व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आस्वादही घेतला. दरम्यान, याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर बाल हक्क संरक्षण आयोग काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहापूर तालुक्यातील भातसई येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेतील 109 विद्यार्थ्यांनी बाहेरून आलेले वर्षश्राद्धाचे पुलाव आणि गुलाबजामचे जेवण केल्याने त्यांना उलट्यांचा तसेच चक्कर व पोटदुखीचा त्रास झाला होता.

बुधवारी झालेल्या या धक्कादायक प्रकारामुळे शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणांची एकच धावपळ उडाली होती. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त करीत परिस्थिती आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, आज संत गाडगे महाराज आश्रमशाळेला महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या नीलिमा चव्हाण यांनी आज भेट देऊन आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी वर्गात जाऊन तसेच वैयक्तिकपणे संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीची विचारणा करताना संतप्त महिला पालकांनी आयोगाच्या सदस्या नीलिमा चव्हाण यांना विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. मुलांना काही झाले असते तर याची जबाबदारी कोणाची असे सांगत दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.यावेळी साबणाची छोटी वडी महिन्यातून एकदाच दिली जाते, डोक्याला लावण्यासाठी सुट्ट्या बॉटल मध्ये तेल दिले जाते अशा अनेक प्रश्नांचा भडिमार केला.

दरम्यान, याप्रकरणी वासिंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधीक्षक एन. डी. अंभोरे यांनी आम्हाला कोणताही अधिकार नसून संस्थाचालक सांगतात त्याप्रमाणे केले जाते असे सांगितले. या शाळेवर महिन्यातून तब्बल 12 ते 15 वेळा जेवण बाहेरून येत असल्याचे ते म्हणाले. अधीक्षक अंभोरे व प्राथमिकच्या प्रभारी मुख्याध्यापिका सारीका गायकवाड यांनी या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नसताना आमच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला असल्याचे सांगितले. याबाबत आयोगाच्या सदस्या नीलिमा चव्हाण यांच्याकडे लेखी दाद मागितली आहे. यावेळी प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, आदिवासी संघटनेचे नारायण केवारी उपस्थित होते.

First Published on: February 2, 2024 10:52 PM
Exit mobile version