पालकमंत्री साहेब कल्याण डोंबिवलीला भेट द्या

पालकमंत्री साहेब कल्याण डोंबिवलीला भेट द्या

जिल्ह्याचे पालकमंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते. ठाणे जिल्ह्याला यापूर्वी गणेश नाईक व एकनाथ शिंदे हे दोन पालकमंत्री जिल्ह्यातीलच मिळाले होते त्यामुळे नाईक असो वा शिंदे या दोघांचाही जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क होता मात्र आत्ताचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ठाणे वगळता जिल्ह्यात कुठेही दिसत नसल्याचे चित्र आहे यावरच बोट ठेवत ठाकरे गटाचे कल्याण मधील विधानसभा सहसंघटक रुपेश चंद्रकांत भोईर यांनी पालकमंत्री साहेब, कल्याण डोंबिवलीत भेट द्या अशी उपहासात्मक मागणीचा लावलेला बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे.

१९९५ पासून गणेश नाईक यांच्याकडे तर २०१५ पासून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद होते. सुदैवाने दोघेही ठाणे जिल्ह्यातीलच असल्याने त्यांनी जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. नाईक यांनी जनता दरबार भरवून जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला तर शिंदे हे छोट्या मोठ्या सर्वच कार्यक्रमांच्या निमित्ताने जिल्ह्यात फिरत राहिले. त्यामुळे दोघांचाही दांडगा जनसंपर्क निर्माण झाला होता.

११ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी पालकमंत्रीपदाची धुरा मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे सोपविली. देसाई हे साताऱ्याचे आहेत. त्यांच्याकडे सातारा आणि ठाणे अशा दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र दोन ठिकाणचे पालकमंत्री पद सांभाळताना देसाई यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसून येते. सप्टेंबर २०२२ मध्ये देसाई यांच्याकडे ठाणे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना उपस्थित राहिले. मात्र पालकमंत्री म्हणून आजवर कधी जिल्हा दौरा केला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांसाठी फिरले आहेत. मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई हे ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात व शहरात देखील फिरकलेच नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील पदाधिकारी आता पालकमंत्री हरविल्याची टीका करत आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण विधानसभा सहसंघटक रुपेश चंद्रकांत भोईर यांनी पालकमंत्री साहेब ,तुमचा पत्ता कुठे लागत नाही, आम्ही तुम्हांला काहीही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या ,जिल्ह्यात असंख्य समस्या आहेत, आम्ही तुमची वाट पहात आहोत, असा मजकूर असलेला बॅनर कल्याण शहरात लावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो बॅनर ताब्यात घेतला असला तरी तो बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे.

 

First Published on: May 28, 2023 10:38 PM
Exit mobile version