मुख्यमंत्र्यांवर झालेल्या मनी लॉड्रिंगच्या आरोपाची गृहमंत्री चौकशी करणार का?

मुख्यमंत्र्यांवर झालेल्या मनी लॉड्रिंगच्या आरोपाची गृहमंत्री चौकशी करणार का?

डोंबिवली । महायुतीत जनतेच्या कल्याणासाठी नव्हे तर खंडणी, जमिनीचे व्यवहार, लुटीचा हिस्सा मिळविण्यासाठी गँगवार सुरू झाले असून मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात आणि ‘बाळराजां’च्या मतदार संघात हे खेदजनक आहे. या गोळीबारा नंतर आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपले कोट्यवधी रुपये पडलेले असल्याचा म्हणजेच मनी लॉड्रिंगचा थेट आरोप केला आहे. याच प्रकारच्या गुन्ह्यासाठी आमच्या सारखे अनेक जणांना तुरुंगात धाडण्यात आले मग त्याच न्यायाने गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना तुरुंगात धाडण्याची कारवाई करणार का? असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाच्या शाखा उद्घाटनासाठी आले होते यावेळी ते बोलत होते.

शिवसेना डोंबिवली शाखेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.त्या कार्यक्रमात पुढे बोलताना त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा बाळराजे असा उल्लेख करत कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण असेल? यापेक्षा बाळराजे पुन्हा लोकसभेत जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. तर शिंदे फडणवीस सरकारचा उल्लेख खोक्यांचे सरकार असा करतानाच थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल तर गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. तर पोलिस स्टेशन मध्ये अंदाधुंद गोळीबार करण्याची वेळ का आली? याचा विचार करण्या बरोबरच महाराष्ट्र सुरक्षित नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या कार्यक्रमास शिवसेना उपनेते विजय साळवी,संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत,जिल्हाप्रमुख सदा थरवळ,उपजिल्हा प्रमुख तात्यासाहेब माने,हर्षवर्धन पालांडे, शहर प्रमुख विवेक खामकर, प्रकाश तेलगोटे, युवा सेनेचे राहुल श्रीधर म्हात्रे आदी उपस्थित होते.

First Published on: February 4, 2024 11:05 PM
Exit mobile version