रिंग रूट प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर; खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केला आढावा दौरा

रिंग रूट प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर; खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केला आढावा दौरा

रिंग रूट प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर; खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केला आढावा दौरा

कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांचे काम सुरु आहे. काही ठिकाणी मोठमोठे पूल बनवले जात आहेत. या सर्व रस्त्यांच्या प्रकल्पांपैकी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणजे रिंग रोड प्रकल्प या रोडचे काम कितपत पोहोचले हे पाहण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी थेट बसने प्रवास केला.खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पाहणी दौऱ्यानंतर प्रकल्पाच्या कामावर समाधान व्यक्त केले. या प्रकल्पाचे दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यानचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम येत्या डिसेंबर अखेर पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. खासदार डॉ. शिंदे यांनी एमएमआरडीए आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत बसने दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यान प्रवास करीत आतापर्यंत झालेल्या रिंग रोडच्या कामाची पाहणी केली.

 

या प्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे, माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, राजेश कदम राजेश मोरे, रवी पाटील आदी उपस्थित होते.कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे २०१४ साली पहिल्यांदा निवडून आल्यापासून लोकसभेमधील सर्व प्रकल्प हाती घेऊन लवकरात लवकर व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत, त्यामधील एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे कल्याण रिंग रूट, या प्रकल्पादरम्यान महापालिका व एमएमआरडीए प्रशासनास अनेक अडचणींचा सामना करावा लागला, तरीही सर्व अडी-अडचणींवर मात करून कल्याण रिंग रूट प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे.

 

यामध्ये विशेषतः लक्ष देऊन प्रत्यक्ष कामास गती दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी व एमएमआरडीए अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.रिंग रोडचा मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी या तिसऱ्या टप्प्याच्या कामासाठीही भूसंपादनाची प्रक्रिया ८० टक्के झाली आहे. या कामाचीही निविदा लवकर प्रसिद्ध केली जाणार आहे. याशिवाय दुर्गाडी ते टिटवाळा याठिकाणी रिंग रोडचा एण्ड पॉईंट आहे. या ठिकाणाहून टिटवाळा ते गोवेलीहा हा रस्ता २ किमी इतका आणखीन जोडण्यासाठी आठवा टप्पाही घेतला जावा, अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आले.

 

अवघ्या २० मिनिटात दुर्गाडी ते टिटवाळा

मोठा गाव ठाकूली ते दुर्गाडी आणि दुर्गाडी ते टिटवाळा हा टप्पा आधी पूर्ण करुन मगच काटई ते मोठा गाव ठाकूर्ली दरम्यानचे रिंगरोडचे टप्प्याचे काम हाती घेतले जाईल. हा प्रशस्त रिंग रोडचे काम पूर्णत्वास आल्यावर दुर्गाडी ते टिटवाळा हे अंतर कमी होणार आहे. अवघ्या २० मिनिटात दुर्गाडी ते टिटवाळा हे अंतर कापले जाणार आहे. हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाचे १०० टक्के काम पूर्ण झाल्यावर सर्वार्थाने वाहतूक कोंडी सूटणार आहे”, असेही खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

 

 

First Published on: June 4, 2021 9:44 PM
Exit mobile version