टायटॅनिक जहाजातील ‘त्या’ प्रवाशाच्या घडाळ्याचा लिलाव!

टायटॅनिक जहाजातील ‘त्या’ प्रवाशाच्या घडाळ्याचा लिलाव!

प्रातिनिधिक फोटो

‘टायटॅनिक’ चित्रपटाच्या माध्यमातून आजच्या पिढीच्या मनातही टायटॅनिक जहाजाचा तो भयानक अपघात जिवंत आहे. १५ एप्रिल १९१२ रोजी हिमनगावर आदळल्यामुळे महाकाय टायटॅनिक जहाजाला, अटलांटिक महासागरात जलसमाधी मिळाली होती. आज त्या घटनेला सुमारे १०० वर्ष लोटूनही टायटॅनिकची भयाण आठवण लोकांमध्ये ताजी आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये टायटॅनिकच्या बुडलेल्या अवशेषातून मिळालेल्या अनेक वस्तूंचा लिलाव करण्यात आला. लोकांनी देखील उत्सुकतेपोटी कोट्यावधी रुपयांची बोली लावून या दुर्मिळ वस्तूंची खरेदी केली. नुकताच टायटॅनिकशी निगडीत आणखी एका वस्तूचा लिलाव पार पडला. टायटॅनिक अपघातात मृत पावलेल्या एका रशियन प्रवाशाचं हे घड्याळ आहे. हे घड्याळ खास त्या काळात मिळणारं ‘पॉकेट वॉच’ असून, या दुर्मिळ पॉकेट वॉचची विक्री ४० लाख रुपयांना करण्यात आली.

टायटॅनिक जहाजाचं दुर्मिळ छायाचित्र (सौ, सोशल मीडिया)

कोण होता ‘तो’ प्रवासी?

टायटॅनिक जहाजासोबत जलसमाधी मिळालेल्या त्या रशियन प्रवाशाचे नाव ‘सिनाई कँटोर’ (३४) असं होतं. मात्र, सिनाईची पत्नी त्या जीवघेण्या अपघातातून वाचली होती. ज्यावेळी शोध मोहिमेनंतर सिनाईचा कोट त्याच्या पत्नीकडे सोपवण्यात आला त्यावेळी कोटाच्या खिशामध्ये हे घड्याळ मिळालं. नवऱ्याची शेवटची आठवण म्हणून सिनाईच्या पत्नीने हे पॉकेट वॉच अनेक वर्ष जपून ठेवलं होतं.

First Published on: August 28, 2018 3:45 PM
Exit mobile version