वाह ताज! आठवडाभर ‘ताज’मध्ये FREE मुक्काम; Valentine Day Offer वर ‘ताज’चा खुलासा

वाह ताज! आठवडाभर ‘ताज’मध्ये FREE मुक्काम; Valentine Day Offer वर ‘ताज’चा खुलासा

प्रेमी युगुलांचा दिवस अर्थात व्हेलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर असल्याने तरूणाईकडून हा दिवस साजरा करण्याकरता जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. आपल्या प्रेयसीला किंवा प्रियकराला कोणती भेटवस्तू द्यायची, कुठे फिरायला जायचे याचं प्लानिंग देखील झाले असेल. दरम्यान, सोशल मीडियावर एक मॅसेज चांगलाच व्हायरल होत आहे. व्हेलेंटाइन डे निमित्त ताज हॉटेल्स प्रेमी युगुलांना खास भेट देणार असल्याचे या मेसेजमध्ये सांगितले आहे. परंतु, हा व्हायरल होत असलेला मॅसेज पूर्णतः खोटा असून याचा खुलासा ताज हॉटेल्स आणि मुंबई पोलिस गुन्हे शाखा यांच्याकडून करण्यात आला आहे.

असा आहे व्हायरल मॅसेज

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मॅसेज नागरिकांना व्हॉट्सअ‍ॅपवरुन येत आहेत, ज्यात असे म्हटले आहे की, ‘मला ताज हॉटेलकडून गिफ्ट कार्ड मिळालं आहे आणि अखेर ताज हॉटेलमध्ये ७ दिवस फ्री मुक्काम करण्याची संधीही मिळाली आहे.’ या व्हायरल होणाऱ्या मॅसेजसह एक लिंक देखील पाठविली जात आहे. ती लिंक क्लिक केल्यावर, एक वेबसाइट ओपन होते. वेबसाइटवर असे लिहिले आहे, ‘ताज एक्सपीरियन्स गिफ्ट कार्ड, ताज हॉटेलने व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी २०० गिफ्ट कार्ड्स पाठवले आहेत. आपण ताजमधील कोणत्याही हॉटेलमध्ये ७ दिवस विनामूल्य राहण्यासाठी हे कार्ड वापरू शकता. आपल्याकडे ३ चान्स आहेत, शुभेच्छा. ‘

व्हायरल मॅसेजमागील ‘ताज’ने सांगितले सत्य

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मॅसेज ताजकडून पाठवण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा मॅसेज ताज हॉटेलने नाकारला असून ट्विट करून निवेदन दिले आहे. ताज हॉटेलद्वारे असे सांगितले गेले की, ‘आमच्या लक्षात आले आहे की एक वेबसाइट व्हॅलेंटाईन डे उपक्रमाला प्रोत्साहन देत आहे आणि व्हॉट्सअ‍ॅपवरुन ताज एक्सपीरियन्स गिफ्ट कार्ड ऑफर करीत आहे. आम्ही असे म्हणू इच्छितो की ताज हॉटेल्स / आयएचसीएलने अशी कोणतीही संधी दिलेले नाही. कृपया फसवणूक होण्याची शक्यता असून सावधनता बाळगा.

पोलिसांकडून अलर्ट राहण्याच्या सूचना

ताज हॉटेलकडून व्हेलेंटाइन डे निमित्त कूपन अथवा गिफ्ट कार्ड भेट देण्यात येत आहे, असा मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये प्रेमीयुगुल ताज हॉटेल्समध्ये ७ दिवस फ्रीमध्ये मुक्काम करू शकतात. परंतु, हा मॅसेज खोटा आहे. असे कोणतेही कूपन किंवा गिफ्ट कार्ड हॉटेलकडून देण्यात येत नाही. असा मेसेज आल्यावर त्यावर विश्वास ठेऊ नका. मेसेजमध्ये जी लिंक देण्यात येत आहे ती ओपन करू नका. या लिंकला क्लिक केल्यास तुमची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी या लिंकविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच अशी लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नका, असे आवाहन सायबर पोलिस ठाणे, गुन्हे शाखा मुंबई यांनी केले आहे.

First Published on: February 2, 2021 6:37 PM
Exit mobile version