‘सेक्रेड गेम्स’ सिरीज वादाच्या भोवऱ्यात

‘सेक्रेड गेम्स’ सिरीज वादाच्या भोवऱ्यात

राजीव गांधी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी

सध्या सर्वत्र चर्चा आहे ती नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली वेब सिरीज सेक्रेड गेम्सची. एकीकडे ही सिरीज लोकांच्या पसंतीस उतरत आहे. तर दुसऱ्या बाजूला ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. बुधवारी या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. सिरिजमधील काही दृष्यांना कात्री लावण्याची मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे. सिरिजमध्ये देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा अपमान करणारे संवाद असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. आच या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. ही सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल आणि न्यायमूर्ती सी. हरिशंकर यांनी सुनावणी घेतली. वकील शशांक गर्ग यांनी यासंदर्भात सांगितले की, अनुराग कश्यप दिग्दर्शित सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत या वेबसिरीजमध्ये ‘बोफोर्स घोटाळा, बाबरी मस्जिद प्रकरण तसेच इतर अनेक घोटाळ्यांवर भाष्य करण्यात आले आहे. त्यामध्ये अनेक ऐतिहासिक घटनांना चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे.

यांच्याविरोधात तक्रार

याचिकेमध्ये नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट, निर्माते आणि फँटम प्रोडक्शन हाऊस आणि केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून राजीव गांधी यांचा अपमान करणारी दृश्य हटवण्याची मागणी केली आहे.

काय आहे डायलॉग

सिरिजमध्ये नवाजुद्दीनच्या तोंडी एक डायलॉग आहे. त्यामध्ये तो असे म्हणतो की, ‘माँ (इंदिरा गांधी) मरी तो बेटा PM बन गया, बनते ही बोफोर्स का घोटाला किया। अपुन सोचा जब देश के PM (Rajiv Gandhi) का ही कोई ईमान नहीं तो अपुन सीधे रास्ते जा के क्या करेगा’. या डायलॉगवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्ये आयटी सेलचे प्रमुख अमीत मालवीय यांनी नवाजुद्दीनचा डायलॉग त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. त्यामुळे वेगळाच वाद उद्भवला आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी याविरोधात संताप व्यक्त केला आहे.

 

 

First Published on: July 12, 2018 3:58 PM
Exit mobile version