‘कोविन ॲप’मधील तांत्रिक समस्येमुळे दोन दिवस लसीकरण स्थगित

‘कोविन ॲप’मधील तांत्रिक समस्येमुळे दोन दिवस लसीकरण स्थगित

मुंबई महापालिकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गाजावाजा करीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला ; मात्र लसीकरणात सर्वात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘कोविन ॲप’ मध्ये मोठी तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे आता कोरोना लसीकरण प्रक्रिया १७ व १८ जानेवारी असे दोन दिवस स्थगित करण्यात आली आहे.

कोविड १९ लसीकरण मोहिमेची आज अंमलबजावणी करत असताना, या मोहिमेसाठी कार्यरत असलेल्या कोवीन ॲप मध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले. ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केंद्र शासनाकडून सुरू आहेत. कोविड लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. आज तांत्रिक अडचण आली असता ऑफलाईन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. तथापि यापुढील सर्व नोंदी ॲप द्वारेच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
ही बाब लक्षात घेता, मुंबईत १७ व १८ जानेवारी असे दोन दिवस कोविड १९ लसीकरण स्थगित ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने रात्री उशिराने घेतला आहे. मात्र कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.

First Published on: January 16, 2021 11:30 PM
Exit mobile version