Fact Check : मुलींच्या लग्नासाठी केंद्र सरकार देणार ४० हजार रुपये?

Fact Check : मुलींच्या लग्नासाठी केंद्र सरकार देणार ४० हजार रुपये?

गेल्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर एक मेसेज भलताच व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये मुलींच्या लग्नासाठी केंद्र सरकारकडून तब्बल ४० हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये मुलींचं लग्न झालेलं असताना हा मुद्दा चर्चेत येत आहे. या मुद्द्यामागची नक्की सत्यता काय आहे? याचा फॅक्ट चेक खुद्द पीआयबी अर्थात प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोकडून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर खुद्द पीआयपीकडून यासंदर्भात ट्वीट करून या मेसेजमागची सत्यता विशद करून सांगितली आहे. त्यामुळे असा मेसेज किंवा असा व्हिडिओ सोशल मीडियावरून किंवा कोणत्याही माध्यमातून आलेल्यांसाठी पीआयबीनं केलेला हा खुलासा महत्त्वपूर्ण ठरतो आहे.

काय आहे हा मेसेज?

सोशल मीडियावर काही व्हिडिओंच्या माध्यमातून देखील हाच मेसेज व्हायरल केला जात आहे. ज्यामध्ये घरात जर मुलीचं लग्न होत असेल, तर त्यासाठी थेट बँक अकाऊंटमध्ये ४० हजार रुपयांची मदत थेट केंद्र सरकारकडून केली जाणार आहे. ‘पंतप्रधान कन्या विवाह योजना’ असं या योजनेचं नाव असल्याचं व्हिडिओमध्ये सांगितलं जात आहे. मात्र, पीआयबीनं अशा कोणत्याही योजनेअंतर्गत पैसे दिले जात असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.

पीआयबीनं दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारची कोणतीही योजना केंद्र सरकारकडून चालवली जात नाही. व्हायरल होत असलेला मेसेज किंवा व्हिडिओ हा पूर्णपणे फेक आहे. शिवाय, कोरोना काळात अशा प्रकारच्या व्हायरल मेसेजेसपासून सावधान राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. त्यासोबतच, अशा प्रकारचा कोणताही मेसेज आल्यास पीआयबीशी संपर्क साधण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आहे.

First Published on: November 1, 2020 6:54 PM
Exit mobile version