व्हायरल चेक: व्हिडिओत नाचणारे ‘ते’ स्वामी भाजपचे उमेदवार नाहीत

व्हायरल चेक: व्हिडिओत नाचणारे ‘ते’ स्वामी भाजपचे उमेदवार नाहीत

भाजपच्या सोलापूर उमेदवाराचा व्हायरल झालेला व्हिडिओ खोटा

लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्व पक्षांनी आपापले उमेदवार आता जाहीर केले आहेत. यंदा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना डच्चू देऊन शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींना उमेदवारी दिली आहे. महास्वामींचे नाव उमेदवारीसाठी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्वामींसारखी दिसणारी एक व्यक्ती नाचत आहे. हा व्हिडिओ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे साफ खोटे असून तो व्हिडिओ त्यांचा नसल्याचे समोर आले आहे.

व्हिडिओ काय आहे?

स्वामींची उमेदवारी जाहीर झाल्यापासून व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ जोरदार शेअर होत आहे. या व्हिडिओत भगव्या कपड्यातील एक मध्यमवयीन स्वामी बेभान होऊन नाचताना दिसतोय. व्हिडिओ सोबत एक कॅप्शनही पाठवली जात आहे. ज्यामध्ये नाचणारा हा इसम भाजपचे सोलापूरचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओवर भाजप किंवा स्वामींकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र माय महानगर वेबटीमने केलेल्या पडताळणीत हा व्हिडिओ स्वामींचा नसल्याचे समोर आले आहे.

‘सावन महिनामा रानी तुले याद करना ये..’

खान्देशातील अहिराणी बोलीभाषेत प्रसिद्ध असलेल्या ‘सावन महिनामा’ या गाण्यावर व्हिडिओतील तथाकथित स्वामी नाचताना दिसत आहेत. हे गाणे खान्देशातील लोकगिताचा प्रकारात मोडते. लग्नसराईच्या काळात खान्देशातील काही जिल्ह्यांमध्ये हे गाणे सर्रास वाजवले जाते. त्याव्यतिरीक्त हे गाणे उर्वरीत महाराष्ट्राला तसे परिचयाचे नाही. त्यातच या गाण्यातील नाचणारा साधू मध्यमवयीन वाटत आहे. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य यांचे वय ६० हून अधिक आहे. भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांचे कार्यक्षेत्र सोलापूर जिल्हा राहिलेले आहे. त्यामुळे खान्देशात जाऊन नाचण्याचा त्यांचा कोणताही संबंध नाही.

सावन महिनामा या अहिराणी लोकगीताचे लेखक सचिन कुमावत आहेत. नुकतेच त्यांनी या गाण्याची लोकप्रियता ओळखून त्यावर नव्या ढंगात एक व्हिडिओ अल्बम केला आहे. युट्यूबवर या गाण्याला लाखोंच्या घरात हिट्स मिळाल्या आहेत.

कोण आहेत डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य

सोलापूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे जंगम समाजातील बेडा जंगम समाजातून येतात. अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव या मठाचे ते मठाधीश आहेत. बनारस विद्यापीठातून त्यांनी पीएचडी मिळवली आहे. मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी भाषेवर स्वामींचे प्रभुत्व आहे. सोलापूर जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक कामे केली आहेत. वीरशैवांनी पोटजाती विसरून एकत्र यावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.

First Published on: March 25, 2019 12:16 PM
Exit mobile version