बापरे! अरबी समुद्रात वाढतोय ‘डेड झोन’

बापरे! अरबी समुद्रात वाढतोय ‘डेड झोन’

प्रातिनिधिक फोटो

समुद्राच्या तळाशी होणारे विविध भौगोलिक बदल याविषयी आपण जाणतोच. अरबी समुद्रामध्येसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून अशाचप्रकारे भौगोलिक उलथापालथ होते आहे. साधारण गेल्या १० वर्षांपासून अरबी समुद्रात ‘डेड झोन’ ने उच्छाद मांडला आहे. महत्वाची बाब म्हणजे सद्यस्थितीनुसार अरबी समुद्रातील ‘डेड झोन’ वेगाने वाढत चालल्याचे समोर आले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या डेड झोनचा थेट परिणाम सागरी जीवनावर होत आहे. हवामानात सातत्याने होणारे बदल हे ‘डेड झोन’ वाढण्यामागचं मुख्य कारण असल्याची शक्यता संशोधकांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान अबुधाबीतील ‘झोहेर लच्कर’ (Zouhair Lachkar) हे नावाजलेले संशोधक याबाबत अधिक तपास करत आहेत. झोहेर सध्या एका रंगीत कॉम्प्युटर मॉडेलच्या मदतीने ओमानच्या खाडीमध्ये याविषयी संशोधन करत आहेत. या मॉडेलच्या माध्यमातून तापमानातील तसंच समुद्र तळाशी घडणारे विविध बदल आणि ऑक्सिजनचे प्रमाण या गोष्टींचा माहिती मिळते. अरबी समुद्रातील या ‘डेड झोन’ विषयी सर्वप्रथम माहिती १९९० साली संशोधकांना मिळाली होती.

डेड झोन म्हणजे काय?

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, डेड झोन म्हणजे समुद्राच्या तळाशी तयार होणार ऑक्सिजनरहित (ऑक्सिजन नसलेला) भाग. डेड झोन साधारण १०० मीटर खोलीपासून तयार होऊन १५०० मीटरपर्यंत वाढू शकतो. डेड झोन तयार झालेल्या भागातील ऑक्सिजन जवळजवळ संपलेला असतो. दरम्यान डेड झोनच्या वाढत्या प्रमाणामुळे अरबी समुद्रातील मासे, वनस्पती आणि अन्य जलचरांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नैसर्गिकरित्या तयार होणारे डेड झोन्स जगात अनेक ठिकाणी आढळले आहेत. मात्र, अरबी समुद्रातील डेड झोन आतापर्यंतचा सर्वात मोठा डेड झोन असल्याचे समोर आले आहे. भविष्यात याचा विपरीत परिणान मत्स्यपालन आणि पर्यटनावरही होऊ शकतो, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

First Published on: July 19, 2018 2:08 PM
Exit mobile version