चांगल्या शेतीसाठी ‘मंत्रोच्चार’ करा- गोवा सरकारचा सल्ला

चांगल्या शेतीसाठी ‘मंत्रोच्चार’ करा- गोवा सरकारचा सल्ला

गोव्याचे कृषीमंत्री- विजय सरदेसाई

आपला देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे ‘शेती’ आणि शेतीविषयीच्या घडामोडींना नेहमीच प्राधान्य दिले जाते. नुकतंच गोवा सरकारने शेतीविषयीचा एक नवा उपक्रम समोर आणला आहे. गोव्यामध्ये चांगली शेती व्हायला हवी असल्यास, आता मंत्रोच्चारण केलं जाणार आहे. गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी चांगल्या शेतीसाठी वैदिक मंत्रोच्चारण करण्याच्या उपक्रमाला मंजुरी दिली आहे. ‘गोव्यातील शेतकऱ्यांनी त्यांची शेती चांगली होण्यासाठी तसंच शेतीतून चांगल्या दर्जाचं पिक मिळावं यासाठी ही मंत्रोच्चारणाची पद्धत अवलंबावी’, असं सरदेसाई यांनी यावेळी सांगितलं.

‘या’ मंत्रामुळे होईल भरभराट

कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितल्यानुसार, शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बसूनच हे मंत्रोच्चारण करणं अपेक्षित आहे. किमान २० मिनिटं शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये बसून ‘ओम रुम जुम साह’ या वैदिक मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राच्या नियमीत जपामुळे शेतीमध्ये भरभराट होते, अशी मान्यता आहे. या मंत्रोच्चारणामुळे शेतातील कॉस्मिक उर्जा वाढते आणि त्यामुळे पीक अधिक चांगल्याप्रकारे बहरतं, अशी धारणा आहे. डॉक्टर अवधूत शिवानंद यांनी हे खास टेक्निक शोधून काढलं आहे.

‘शिव योग’ कॉस्मिक फार्मिंगचा प्रचार

डॉक्टर शिवानंद यांनी शोधून काढलेल्या या खास टेक्निकला त्यांनी ‘शिव योग कॉस्मिक फार्मिंग’ असं नाव दिलं आहे. डॉ. शिवानंद हे केमिकल इंजिनिअरींगचे विद्यार्थी होते. सध्या ते गुरुग्राममध्ये शिव योग फाउंडेशन चालवतात. नुकतेच शिवानंदन हे त्यांच्या गोवास्थित घरी या खास मंंत्रोच्चारणाच्या प्रसारासाठी आले होते. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी आयोजित केलेल्या शिबीरामध्ये गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई त्यांच्या पत्नीसह सहभागी झाले होते. शिबीरादरम्यान सरदेसाई यांना या खास मंत्रोच्चारणाचे महत्व पटले आणि त्यामुळे त्यांनी याचा प्रसार करण्याचे ठरवले. ‘हा उपाय सर्वांना सहज करता येण्यासारखा असून, मुख्य म्हणजे यासाठी कुठलाही खर्च नाही’, असे मत सरदेसाईंनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांना आवाहन

कृषीमंत्र्यांनी गोवा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना उत्तम शेतीसाठी आणि पिकांच्या भरभराटीसाठी ‘ओम रुम जुम साह’ या मंत्राचा नियमीत जप करण्याचे आवाहन केले आहे. एकही रुपया खर्च न करता हा उपाय करणं सहज शक्य असल्यामुळे, अधिकाधिक शेतकऱ्यांनी ही मंत्रोच्चारणाची ही पद्धत अवलंबवावी असं सरदेसाई यांनी सांगितलं आहे. दरम्यान डॉक्टर शिवानंद यांच्या शिबीरात हे मंत्रोच्चारण नेमकं कसं करावं, याबाबतचा एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. हा व्हिडिओ देखील शेतकऱ्यांसाठी सध्या व्हायरल केला जातो आहे.

 

First Published on: July 4, 2018 3:33 PM
Exit mobile version