Corona गुगल डुडल; ‘डॉक्टरांना हात धुवायला शिकवणारा अवलिया’

Corona गुगल डुडल; ‘डॉक्टरांना हात धुवायला शिकवणारा अवलिया’

करोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी लोकांनी कशापद्धतीने काळजी घ्यायची आहे? हे वारंवार सांगितले जात आहे. तब्बल २० सेकंद काळजीपूर्वक हात धुतले जावेत, असे WHO पासून सर्व यंत्रणा सांगत आहेत. मात्र ही हात धुण्याची पद्धत नेमकी उदयास आली कशी? हात स्वच्छ धुवावेत, या संकल्पनेचा कोणी उद्गाता असू शकतो का? मंडळी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर होय असे आहे. संपूर्ण जग करोना विषाणूचा नाश टाळण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा गुगलने डूडल बनवून एका विशेष व्यक्तीची आठवण काढली आहे. ज्या व्यक्तीने हात धुण्याची योग्य पद्धत शोधली. गूगलनेही करोनावर डूडल तयार करुन डॉ. इग्नाझ सेमेलवेसची आठवण काढली आहे. गुगलने डॉ. इग्नाझ सेमेलवेस यांचा फोटो डुडलमध्ये वापरत एक व्हिडिओ बनवला आहे. ज्यामध्ये हात धुण्याच्या पद्धतींबद्दल माहिती देण्यात आली आहे.

गूगलने का काढली डॉ. इग्नाझ सेमेल्विस?

करोनापासून बचाव करण्यासाठी सर्वात जास्त आपले हात स्वच्छ ठेवण्यासाठी भर दिला जातो आहे. २० ते ४० सेकंद हात धुतले पाहिजे. त्यामुळे हा विषाणू शरीरात जाण्याची शक्यता कमी असते. पण, १९ व्या शतकात हातातल्या जीवाणू आणि विषाणूमुळे रोग पसरु शकतो हे माहित नव्हते. अगदी डॉक्टरही हात धुत नव्हते. त्यानंतर सेमेलविस व्यक्तीने हात धुण्याचे फायदे शोधले आणि सतत होत असलेल्या मृत्यूवर आळा घालण्यास त्यांना यश आले.

त्यानंतर हात धुण्याच्या सवयीला सुरूवात

खरंतर, १९ व्या शतकाच्या मध्यात एका अज्ञात रोगामुळे वेगाने लोक मरत होते. हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यावेळी हात धुण्याची प्रथाच नव्हती. डॉक्टरही हात धुत नव्हते. डॉ. इग्नाझ सेमेलवेस यांनी असे पाहिले की, अज्ञात आजारामुळे माता आणि नवजात बालके जलद गतीने मरत आहेत. त्यावेळी, डॉक्टर इग्नाझ सेमेल्विस यांनी असा सल्ला दिला की डॉक्टरांनी प्रथम हात स्वच्छ ठेवण्यास सुरुवात करायला हवी. त्यांना असे आढळले की डॉक्टर आणि इतर कर्मचारी नकळत स्त्रिया आणि इतर रुग्णांना बॅक्टेरियाचा संसर्ग देत आहेत.

त्यांचा हा प्रस्ताव १८४० मध्ये व्हिएन्नामध्ये लागू झाला. हँडवॉशिंग सिस्टम लागू केल्यानंतर मृत्यूचे प्रमाण झपाट्याने कमी झाले. प्रसूतिगृहातील मृत्यू कमी झाले. तथापि, बर्‍याच डॉक्टरांनीही हात धुण्याचा मुद्दा गांभिर्याने घेतला नव्हता. त्यामुळे, हा प्रयोग फारसा यशस्वी होऊ शकला नाही. हॉस्पिटलमध्ये नसलेल्या स्वच्छतेमुळे आणि संसर्गामुळे आजार पसरु शकतो यावर डॉक्टरांचा विश्वास बसत नव्हता. पण, त्यानंतर डॉ. इग्नाझ सेमेलवेस हे गर्भवती महिलांचे प्राण वाचवणारे डॉक्टर म्हणून ओळखू लागले.

कोण होते डॉ. इग्नाझ सेमेल्विस?

डॉ. इग्नाझ सेमेल्विस हे व्हिएन्नामधील सामान्य हॉस्पिटलमध्ये फिजिशियन म्हणून कार्यरत होते. आजच्या दिवशी त्यांना व्हिएन्ना जनरल हॉस्पिटल आणि प्रसूती क्लिनिकचे मुख्य अधिकारी हे पद देण्यात आलं होतं. नंतर त्यांच्या शोधाने प्रसिद्धी मिळविली. सेमेल्विस यांचा जन्म हंगेरीमध्ये झाला होता. व्हिएन्ना विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट मिळविली. आज जेव्हा संपूर्ण जग कोविड -१९ म्हणजेच करोना विषाणूने ग्रस्त आहे, तेव्हा डॉक्टर वेळोवेळी प्रत्येकाला हात व्यवस्थित धुवावेत असा सल्ला देत आहेत.

First Published on: March 20, 2020 5:52 PM
Exit mobile version