मित्रांनो मी ठणठणीत आहे – शाहिद कपूर

मित्रांनो मी ठणठणीत आहे – शाहिद कपूर

अभिनेता शाहिद कपूर

अभिनेता शाहिद कपूरला कर्करोगाची लागण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. एका वेबसाइटने शाहिदचं नाव न घेता बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध डान्सर अभिनेत्याला पोटाच्या कॅन्सरची लागण झाल्याचं वृत्त दिलं होतं. तेव्हापासूनच शाहिदच्या नावाची चर्चा सुरू झाली. इतकंच नव्हे तर उपचारासाठी शाहिद मुंबईबाहेर गेल्याचीही अफवा होती. शाहिदच्या कुटुंबाने या अफवांना धुडकावून लावले होते. मात्र आता स्वतः शाहिदने ट्विटकरून ही अफवा असल्याचे सांगितले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्याने हे ट्विट केले आहे. यानंतर शाहिदच्या फॅन्सने या ट्विटवर आपला आनंद व्यक्त केला आहे.

२०१५ ला झाले होते लग्न

शाहिद कपूर हा ३७ वर्षीय अभिनेता असून त्याने २०१५ साली मीरा राजपूत हिच्याशी लग्न केले होते. त्यांना दोन वर्षांची मुलगी मिशा तर दोन महिन्यांचा मुलगा झैन आहेत. अभिनेता पंकज कपूर आणि अभिनेत्री नीलिमा अझीज यांचा तो मुलगा आहे. मात्र त्यांच्य घटस्फोटानंतर नीलिमा यांनी राजेश खट्टर तर पंकज कपूर यांनी सुप्रिया पाठक यांच्याशी लग्न केले. २००३ साली शाहिदने इश्क विश्क चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.

शाहिद दिल्लीत

शाहिदला कर्करोग झाल्याच्या चर्चा अफवा असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. ‘शाहिदला कर्करोग झाल्याची बातमी आली तरी कुठून? अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यात कोणाला काय आनंद मिळतो,’ असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे शाहिद काही कामानिमित्त दिल्लीला गेला असून दोन-तीन दिवसांत मुंबईला परतणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

First Published on: December 10, 2018 2:31 PM
Exit mobile version