टिक टॉक व्हिडिओ बनवताना जंगलात हरवला; व्हॉट्सअॅपमुळं सापडला

टिक टॉक व्हिडिओ बनवताना जंगलात हरवला; व्हॉट्सअॅपमुळं सापडला

टिक टॉकमुळे हरवलेला व्हॉट्सअॅपमुळे सापडला

टिक टॉक व्हिडिओ बनवण्याचा नाद आंध्र प्रदेशमधील तरुणाच्या भलताच अंगाशी आला. मात्र एका अॅपमुळे अडचणीत सापडलेला तो तरुण दुसऱ्या अॅपच्या माध्यमातून सहीसलामत सुटल्याचा अजब प्रसंग घडला आहे. आंध्र प्रदेशच्या तिरुमाला टेकड्यांवरील सेशाचलम जंगलात मुरली नावाचा विद्यार्थी टिक टॉकवर व्हिडिओ बनवण्यासाठी गेला होता. मुरली मुळचा चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी असून तो पदवीच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरली चंद्रगिरी परिसरातून जंगलात शिरला होता. जंगलातील एका टेकडीच्या टोकावर जाऊन त्याला झेंडा रोवतानाचा व्हिडिओ काढायचा होता. रविवारी दुपारी तो जंगलात गेला होता. व्हिडिओ बनविल्यानंतर परतत असताना मुरली रस्ता विसरला. बराच वेळ प्रयत्न करुनही त्याला रस्ता मिळाला नाही. शेवटी त्याने एक शक्कल लढवली. आपल्या एका मित्राला व्हॉट्सअॅप लाईव्ह लोकेशन पाठवून त्याने स्वतःला शोधण्यासाठी मदत मागवली.

व्हॉट्सअॅपवर मुरलीचे लोकेशन मिळाल्यानंतर त्याच्या मित्रांने पोलीस आणि त्याच्या कुटुंबियांना ही माहिती दिली. पोलिसांनीही लागलीच मिळालेल्या लोकेशनप्रमाणे शोध पथके नेमली. त्यानंतर काही तासांच्या शोधमोहिमेनंतर सोमवारी रात्री ३ वाजता मुरली बेशूद्ध अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

सेशाचलम जंगल हे बिबट्यांचे घर समजले जाते. मध्यंतरी या भागात एका मुलीवर बिबट्याने हल्ला चढवला होता. बाजूच्या तामिळनाडू राज्यातील तस्कर सेशाचलममध्ये महागड्या लाकडाची चोरी करण्यासाठी येत असतात.

First Published on: July 29, 2019 4:35 PM
Exit mobile version