शिख असल्यामुळे त्याला नाकारला हॉटेलमध्ये प्रवेश, दिल्लीतला प्रकार!

शिख असल्यामुळे त्याला नाकारला हॉटेलमध्ये प्रवेश, दिल्लीतला प्रकार!

(Photo Courtesy-India Today)

सर्वधर्म समभाव आणि सहिष्णु वृत्तीचा पुरस्कार या गोष्टींना कायमच पाठिंबा मिळत असला, तरी देशाची राजधानी दिल्लीमध्ये मात्र चित्र काहीसं वेगळं दिसत आहे. परम साहीब नावाच्या एका शिख व्यक्तीला तो शिख असल्यामुळे आणि त्याची दाढी व्यवस्थित नसल्यामुळे दिल्लीतल्या ‘वी कुतुब’ या हॉटेलने प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे व्यथित झालेल्या या तरुणाने इन्स्टाग्रामवर त्यासंदर्भात तक्रार करणारी पोस्ट टाकल्यानंतर मात्र हॉटेल व्यवस्थापनाला जाग आली आणि त्यांनी त्या तरुणाची रीतसर माफी देखील मागितली आहे. एवढंच नव्हे, तर त्या तरुणाच्या विनंतीवरूनच गुरुद्वारामध्ये १०० अनाथ मुलांसाठी लंगर देखील ठेवण्याचं हॉटेल व्यवस्थापनाने मान्य केलं आहे.

नक्की घडलं काय?

परमने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टनुसार, परम साहिब शनिवारी आपल्या दोन मैत्रिणींसोबत वी कुतुब या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. मात्र, त्याला दारावरच हॉटेलचा मॅनेजर रवी याने अडवलं. त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला गेला. शीख असल्यामुळे आणि दाढी व्यवस्थित ट्रीम न केल्यामुळे त्याला आणि त्याच्या मैत्रिणींना प्रवेश नाकारला गेला. शिवाय त्याच्या मैत्रिणींसोबत काऊंटरवरच्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने संभाषण केल्याचं देखील परमने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘काऊंटरवरच्या माणसाने आम्हाला सांगितलं की ते शीख लोकांना हॉटेलमध्ये प्रवेश देत नाहीत आणि हीच त्यांची पद्धत आहे’, असं देखील परमने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हॉटेलनं मागितली बिनशर्त माफी

दरम्यान, परमच्या या पोस्टची हॉटेल प्रशासनाने दखल घेत त्याची इन्साग्राम पोस्टवरूनच जाहीर माफी मागितली आहे. तसेच, त्याला प्रवेश नाकारणाऱ्या रवी नावाच्या हॉटेल मॅनेजरची नोकरीवरून हकालपट्टी देखील केल्याचं पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय, परमच्या विनंतीप्रमाणे गुरुद्वारामध्ये लवकरच अनाथ मुलांसाठी लंगर ठेवण्यात येणार असल्याचं या पोस्टमध्ये हॉटेल प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

First Published on: September 10, 2019 10:36 PM
Exit mobile version