मोदींना आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी तरुणाचा १३०० किमीचा प्रवास

मोदींना आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी तरुणाचा १३०० किमीचा प्रवास

मुक्तिकांता बिस्वाल रुरकेलाहून हातात तिरंगा घेऊन निघालेला तरूण

भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न जनतेला दाखवण्यात यशस्वी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याच आश्वासनाचा विसर पडतो. भाजपविरोधी पक्षांकडून याबाबत अनेकदा टीका, आंदोलने केली गेली. मात्र ओडिशातल्या रुरकेला येथील युवकाने तर यापुढची पायरी गाठली आहे. रुरकेला येथे सर्व सुविधांनी सज्ज असलेले हॉस्पिटलचे आश्वासन मोदींनी दिले, मात्र वर्ष लोटली तरी हॉस्पिटल काही प्रत्यक्षात उतरले नाही. याच आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी रुरकेला गावचा मुक्तीकांता बिस्वाल हा ३० वर्षीय तरुण पायपीट करत मोदींना भेटायला निघाला. तब्बल १,३५० किमींचा प्रवास त्याने आतापर्यंत केला आहे.

काय होते मोदींचे आश्वासन

एप्रिल २०१४ साली रुरकेला येथील इस्पात हॉस्पिटलला अद्ययावत करण्यासंबंधीचे आश्वासन तेव्हाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी दिले होते. १ एप्रिल २०१५ साली तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा रुरकेलाचा दौरा केला आणि इस्पात हॉस्पिलला मेडीकल कॉलेज तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला असल्याचे जाहीर केले. रुरकेलाच्या जाहीर सभेत त्यांनी हॉस्पिटलची घोषणा केल्यानंतर उपस्थित जनसमुदायांनी मोदी, मोदी असा एकच गजर केला होता.

… आणि मुक्तीकांता चालू लागला

मुक्तिकांता रुरकेलाच्या ज्या गावात राहतो तिथे रोज आरोग्याच्या गंभीर प्रश्नांना लोकांना सामोरे जावे लागते. आरोग्याच्या प्राथमिक सुविधांची वाणवा येथे जाणवते. मोदी आले भाषण देऊन गेले, पुढे काय? हा प्रश्न मुक्तीकांताला स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणून त्याने थेट त्यानांच जाब विचारण्याचा चंग बांधला. गरजेच्या वस्तू सोबत घेऊन त्याने बॅग भरली आणि तो १६ एप्रिल रोजी घरातून बाहेर पडला. आग्रापर्यंत येता येता त्याने १,३५० किमींचा पल्ला पायी चालत गाठला होता. मात्र तब्येत खराब झाल्यामुळे तो आग्रा येथील महामार्गावर कोसळला.

हजारो मैल चालल्यानंतर थकून आजारी पडलेला मुक्तिकांता बिस्वाल

मोदींजीनी २०१५ साली आश्वासन दिल्यापासून आमच्या गावातील रहिवासी हॉस्पिटल अद्ययावत होण्याच वाट पाहत होते. तसेच ब्राह्मणी नदीवर रुरकेला येथे पूल बांधण्याचेही आश्वासन त्यांनी दिले होते. दोन्ही गोष्टी झालेल्या नाहीत. त्यामुळे या कामांची चौकशी करण्यासाठी मी स्वतः दिल्लीला जात असल्याचे मुक्तिकांताने एएनआय या वृत्तसेवा संस्थेला सांगितले. भारताच्य प्रत्येक नागरिकाला प्राथमिक आरोग्य सुविधा मिळाल्या पाहीजेत. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे कित्येक लोकांना याचा फटका बसत आहे. या सर्वांच्या परिस्थितीमुळेच मला हजारो किमी चालण्याची प्रेरणा मिळाली असल्याचेही मुक्तिकांता सांगतो.

भाजपचे फिट इंडिया तर काँग्रेसचे डोनेट इंडिया चँलेज

सतत सोशल मीडियावर मोहिम राबवणाऱ्या भाजपला या विषयावर काँग्रेसने धारेवर धरले आहे. बिस्वाल दिल्लीत पोहोचेलही. पण कोट्यवधी भारतीयांची ज्या प्रकारे आश्वासने देऊन बोळवण केली जात आहे. त्याप्रकारेच रुरकेलावासियांची होईल. त्यांना पुन्हा एकदा आश्वासनच मिळेल.
त्यामुळे काँग्रेसने पुढाकार घेऊन वर्गणी गोळा करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येकाने १०० रुपये जरी दिले तरी हॉस्पिटलच्या पुर्नबांधणीसाठी पुरेसा निधी जमा होऊ शकतो. पंतप्रधान जर आपली भूमिका पार पाडू शकत नसतील तर नागरिकांनीच पुढे यायला हवं, अशी भूमिका काँग्रेस पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर स्पष्ट करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देणगीचे चँलेज स्वीकारले

रुरकेलाचे हॉस्पिटल अद्ययावत करण्यासाठी काँग्रेसचे नेते पुढे सरसावले आहेत. दिग्विजय सिंह यांनी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना देणगी देण्यासाठी ट्विटरवरून आवाहन केले. त्याचा स्वीकार करुन चव्हाण यांनी स्वतः देणगी दिलीच त्याशिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विश्वजीत कदम आणि सतेज पाटील यांनाही देणगी देण्यासाठी ट्विटरवरून आवाहन केले आहे.

 

First Published on: June 28, 2018 9:58 PM
Exit mobile version