मुंबईकर विकेंडला पुन्हा गारठणार, ब्रेकनंतर थंडीचं कमबॅक

मुंबईकर विकेंडला पुन्हा गारठणार, ब्रेकनंतर थंडीचं कमबॅक

मुंबईतील तापमानाचा पारा घसरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत थंडीचा परिणाम काही प्रमाणात कमी झाला होता. गेले काही दिवस मुंबईच्या तापमानात कमालीची वाढ झाली होती. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पुन्हा एकदा थंडीचा अनुभव घेता येणार आहे. मुंबईमध्ये पुढील दोन दिवस किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येणार आहे. यासह मध्य महाराष्ट्र राज्याच्या इतर भागात देखील तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असणार आहे. याबाबतचे ग्राफ ट्विट हवामान विभागाचे उप महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी केले आहेत.

कृष्णानंद होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळेने नोंदवलेले तापमान देण्यात आले आहे. गेले दोन दिवस तापमानात सातत्याने वाढ होत होती. मात्र, मुंबईतील तापमानाचा पारा घसरला आहे. कुलाबा वेधशाळेने २१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले आहे तर, सांताक्रूझ वेधशाळेने २०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे. दरम्यान, २६ आणि २७ फेब्रुवारीला किमान तापमान १४ अंश सेल्सिअस ते १६ अंश सेल्सिअस पर्यंत खाली येणार आहे. कमाल आणि किमान तापमानातील फरकामुळे शहरात दिवसा कमालीचा उकाडा तर रात्री आणि पहाटे थंडी असे विषम हवामान अनुभवायला मिळत आहे.

बोरिवलीत सर्वाधिक गारवा

मुंबईत अनेक भागात आज सकाळी तापमान हे २० अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरले होते. पण सर्वाधिक किमान तापमान हे बोरिवलीत नोंदवले गेले. बोरिवलीत आज १६.६३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ पनवेल १६.९४ अंश सेल्सिअस, पवई १७.९३ अंश सेल्सिअस, भांडूप १९.४० अंश सेल्सिअस येथे किमान तापमानाची नोंद झाली.

First Published on: February 21, 2020 10:54 AM
Exit mobile version