Video : हातात कोयते घेऊन Tik Tok वर डान्स; दोघांना अटक

Video : हातात कोयते घेऊन Tik Tok वर डान्स; दोघांना अटक

हातात कोयते घेऊन नाचणाऱ्या तरुणांना पोलिसांनी केली अटक

टिक-टॉकवर हातात कोयते घेऊन डान्स करत व्हिडिओ काढणे पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे निलख येथील तरुणांना महागात पडलं आहे. त्यांच्यावर सांगवी पोलिसांनी कारवाई केली असून दोघांना जेरबंद केलं आहे. मंगळवारी देखील अशाच प्रकराची कारवाई वाकड पोलिसांनी केली होती. दाखले नामक गुन्हेगाराच्या त्यांनी मुसक्या आवळल्या होत्या. अभिजित संभाजी सातकर (वय २२) शंकर संजय बिराजदार अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे असून जीवन रावडेचा शोध पोलीस घेत आहेत. तर एका अल्पवयीन मुलाचा या व्हिडिओमध्ये सहभाग आहे.

हे देखील वाचा – Video: हातात कोयता घेऊन TikTok व्हिडिओ; थेट पोलीस ठाण्यात रवानगी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त आर. के पदनाभन यांनी दिलेल्या आदेशाला डावलून, परिसरात दहशद माजविण्याच्या उद्देशाने हातात कोयते घेऊन टिक-टॉक अॅपवर व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. ‘अरे पकडनेकी बात छोड अपुण को टच भी नहीं कर सकता’, अशा प्रकारच्या संवादावर या तरुणांनी डान्स केला आहे. त्यापैकी तिघांच्या हातात कोयते असून एक जण असाच नाचत आहे. हा व्हिडिओ पोलीस कर्मचारी पिसे यांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक साळुंखे यांची मदत घेऊन संबंधित तरुणांना शोधून काढले.

दरम्यान, चारपैकी दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. तर आणखी एकाचा शोध पोलीस घेत असून चौथा मुलगा अल्पवयीन आहे. या सर्वांवर आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यांच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, गुन्हे पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवस होणाऱ्या पोलीस कारवाईमुळे टिक-टॉक प्रेमींमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ घेणे टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

First Published on: May 15, 2019 11:43 AM
Exit mobile version