करोनामुळे पोलिसांची फटकेबाजी टिकटॉकवरही फेमस

करोनामुळे पोलिसांची फटकेबाजी टिकटॉकवरही फेमस

मुंबईसह महाराष्ट्रात करोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून सोशल मीडियावर करोना सबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. आता तर देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन केल्याने अनावश्यक भटकंती करणाऱ्यांना चोप देण्यासाठी रस्त्यावर पोलीस घिरट्या घालत आहे. जे समज देऊनही ऐकत नाहीत त्यांना पोलिसांकडून लाठी मारून घरी पाठवले जात आहे. मात्र त्याचे व्हिडिओ काही तरुणांकडून चित्रित करून टिकटॉकवर टाकण्यात आले आहेत. सध्या हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

भारतासह संपूर्ण जगात करोना विषाणूची दहशत पसरली आहे. प्रशासन करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध स्तरावर कामाला लागले आहे. पोलीस यंत्रणाकडून नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जे लोक विनाकारण बाहेर पडत आहेत, अशांना लाठीचा धाक दाखवला जात आहे. तर वेळ प्रसंगी त्यांना लाठी सुद्धा खावी लागत आहे. मात्र काही तरुण वर्ग हे व्हिडिओ चित्रित करून सर्रास टिकटॉकवर अपलोड करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने व्हिडिओ चित्रित करण्याची जणूकाही स्पर्धा रंगली आहे. पोलिसांकडून आता अशा टिकटॉक बहाद्दरांना आवरण्याचे काम सुरु आहे. नुकतेच नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. तर मुंबईत सुद्धा असे व्हिडिओ तयार करण्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दैनिक आपलं महानगरला दिली आहे.

रस्त्यावर टिकटॉक व्हिडिओ केला तर मोबाईल होणार जप्त

करोनाचा पार्श्‍वभूमीवर कलम १४४ लागू करण्यात आला आहे. मात्र काही काम नसताना तरुण वर्ग घराबाहेर पडून मोबाईलद्वारे टिकटॉक व्हिडीओ तयार करत असल्याचे निदर्शनास येत आहे. आता रस्त्यावर टिकटॉक व्हिडिओ बनविणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. मोबाईल सुद्धा जप्त करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की, कृपया दिलेल्या आदेशाच पालन करत घरात बसवावेत.

करोना संबधित टिकटॉकवर जनजागृती

भारतात सुद्धा करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत जात आहे. त्याच बरोबर शासनाकडून युद्धस्तरावर जनजागृती सुद्धा सुरू केली आहे तर महाराष्ट्रातील जनतेने घराबाहेर न पडण्याचे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच घराबाहेर पडणाऱ्या मास्क किंवा रुमाल बांधून बाहेर पडण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. याबाबत जनजागृती आणि विनोदी टिकटॉक व्हिडिओ तरुण वर्ग तयार करताना दिसून येत आहे. हे व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल होत आहेत.

First Published on: March 25, 2020 8:13 PM
Exit mobile version