सलग दुसर्‍या दिवशी सेन्सेक्स, निफ्टीत घसरण

सलग दुसर्‍या दिवशी सेन्सेक्स, निफ्टीत घसरण

शेअर बाजार

जागतिक पातळीवरील अनुत्साह, परदेशी आणि देशातील गुंतवणुकदारांनी केलेल्या मोठ्या विक्रीमुळे गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक, सेन्सेक्स ३७७.८१ अंकांनी (१.०५ टक्के) खाली येऊन तो ३५,५१३.७१ अंकांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १२०.२५ अंकांनी (१.११ टक्के) खाली येत १०,६७२.२५ अंकांवर बंद झाला.

गुरुवारी शेअर बाजाराच्या विक्रीचे वातावरण होते. सेन्सेक्समधील ३१ कंपन्यांपैकी २६ आणि निफ्टीतील ५० कंपन्यांमधील ४२ कंपन्यांचे शेअर गडगडले होते. सेन्सेक्समधील ज्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली त्यात महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा (३.०४ टक्के), ओएनजीसी (२.९८ टक्के), वेदांता (२.६४ टक्के), टाटा स्टील (२.५९ टक्के), लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो (२.२७ टक्के), एचडीएफसी (२.१८ टक्के), एनटीपीसी (२.१८ टक्के), अ‍ॅक्सिस बँक (१.७७ टक्के) यांचा समावेश आहे.

निफ्टीमध्ये आयशर मोटर्स (४.२२ टक्के), हिंदुस्तान पेट्रोलियम (३.४७ टक्के), ओएनजीसी (३.३४ टक्के), इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स (३.३६ टक्के), इंडियन ऑईल (३.३२ टक्के), अल्ट्राटेल सिमेंट (३.२२ टक्के), महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा (३.२० टक्के), टेक महिंद्रा (२.६८ टक्के), हिंडाल्को (२.६१ टक्के) आणि टाटा स्टील (२.५८ टक्के) यांचा समावेश आहे.
सकाळी ९.१५ वाजता शेअर बाजारात मामुली तेजी होती. सेन्सेक्स ४२.९८ तसेच निफ्टी ४.३ अंकांच्या घसरणीने अनुक्रमे ३५,९३४.५० आणि १०,७९६.८० अंकांवर सुरु झाला. पुढील आठवड्यात येणार्‍या कंपन्यांच्या तिमाही कामगिरीच्या अहवालामुळे बाजारात उतार-चढाव दिसून आला. त्याशिवाय परदेशी आणि देशातील गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्यामुळे बाजारावर दबाव होता.

First Published on: January 4, 2019 4:02 AM
Exit mobile version