१६ वर्षीय मुलाला लागलं पबजीचं व्यसन; गेमच्या नादात अन्न, पाणी सोडल्याने झाला मृत्यू

१६ वर्षीय मुलाला लागलं पबजीचं व्यसन; गेमच्या नादात अन्न, पाणी सोडल्याने झाला मृत्यू

पबजी या गेमच्या व्यसनामुळे एका १६ वर्षीय मुलाला जीव गमावावा लागल्याची पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. या मुलाला पबजी गेमचं व्यसन लागलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून तो केवळ पबजी गेम खेळत होता. या खेळापाई त्याने अन्नपाणी सोडलं होतं. यामुळे त्याचा मृत्यू झाला.

लॉकडाऊनमुळे हा मुलगा गेल्या अनेक महिन्यांपासून घरीच होता. मात्र घरी वेळ घालवण्यासाठी त्याने पबजी खेळण्यास सुरुवात केली आणि त्याला पबजीचं व्यसनच लागलं. पबजीसाठी त्याने अन्न पाण्याचाही त्याग केला. गेम खेळण्याच्या नादात तो अनेक दिवस जेवायचाही नाही.

गेमच्या नादात पाणी न पिणं आणि जेवण टाळणं किंवा वेळेत जेवण न घेतल्याने या मुलाची प्रकृती बिघडली. या मुलाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानं त्याला डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला इलूरूमधील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डायरिया म्हणजेच शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण सतत कमी होत गेल्याने त्याची प्रकृती आणखीन खालावली आणि उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला.

यापूर्वीही अशाप्रकारे पबजी गेमच्या व्यसनामुळे २५ वर्षीय मुलाला प्राण गमावावे लागल्याची घटना पुण्यात घडली होती. गेम खेळता खेळता तरुणाला ‘मेंदू घाता’चा (ब्रेन स्ट्रोक) झटका आला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पुण्यात मरण पावलेल्या या मुलाचे नाव हर्षल मेमाने असं होतं. गेम खेळताना अचानक हर्षलला आपल्याला उजवा पाय आणि हात हलवता येत नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं. त्याच्या मेंदूवर सतत गेम खेळल्याने गंभीर परिणाम झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

First Published on: August 14, 2020 2:27 PM
Exit mobile version