२००० रुपयांची नोट होणार बंद? जाणून घ्या काय आहे नेमकं कारण

२००० रुपयांची नोट होणार बंद? जाणून घ्या काय आहे नेमकं कारण

प्रातिनिधीक फोटो

भ्रष्टाचार आणि काळ्या व्यवहारावर आळा बसावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ साली पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून अकस्मात रद्द करण्याचा निर्णय घेतला. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची ऐतिहासिक घोषणा केली होती. रात्री आठ वाजता केलेल्या या घोषणेमध्ये रात्री १२ वाजेपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा कायदेशीररित्या व्यवहारातून बाद करण्यात येतील असं सांगण्यात आलं. या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांना फक्त कागदाची किंमत राहिली. त्यावेळी या निर्णयाचे काहींनी स्वागत केले तर काही हातवरचं पोट असणाऱ्यांचा हिरमोड झाला आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. यानतंर आता पुन्हा २ हजार रूपयांचा नोटा बंद होणार अशी चर्चा रंगताना दिसतेय.

गेल्या दोन वर्षात २ हजार रुपयांची एकही नोट छापली गेली नाही, तर त्याची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी संसदेला दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, ३० मार्च २०१८ रोजी २००० रुपयांच्या ३३६.२ कोटी नोटा चलनात आल्या होत्या, तर २६ फेब्रुवारी २०२१ रोजी ही संख्या २४९.९ कोटींवर आली असल्याचे सरकारने लोकसभेत सांगितले. तर अर्थ राज्यमंत्री यांनी असे सांगितले की, ‘कोणत्याही नोटांच्या छपाईचा निर्णय नागरिकांच्या देवाण-घेवाण आणि व्यवहारांच्या मागणीवर ठरत असतो. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आरबीआयच्या सल्ल्यांचा विचार केला जातो.’ ते असेही म्हणाले, ‘२०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये २००० रुपयांच्या नोटांची छपाई करण्याचा आदेश मिळालेला नाही.’

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१९ मध्ये सांगितले की, २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३५४.२९९१ कोटी नोटांची छपाई करण्यात आली होती. तर २०१७-१८ मध्ये फक्त ११.१५०७ कोटी नोटांची छपाई करण्यात आली होती. दरम्यान २०१८-१९ मध्ये ४.६६९ कोटी नोटा छापल्या गेल्यात तर एप्रिल २०१९ नंतर एकही नोट छापण्यात आली नाही. असे सांगितले जात आहे की, काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर सरकारने नवीन ५०० रुपयांची नोट आणि २ हजार रुपयांची नोट जारी केली. या २००० रुपयांच्या नोटेशिवाय सरकारने १०,२०,५० आणि १०० रुपयांच्या नवीन नोटा देखील जारी केल्या आहेत.

First Published on: March 15, 2021 7:14 PM
Exit mobile version