‘पुरुषच का? महिलांनो तुम्हीही बिनधास्त गॅस सोडा’ – नीना गुप्ता

‘पुरुषच का? महिलांनो तुम्हीही बिनधास्त गॅस सोडा’ – नीना गुप्ता

अभिनेत्री नीना गुप्ता

‘Why Should Boys Have All the Fun’ हे वाक्य असलेली स्कुटीची जाहीरात मध्यंतरी खूप प्रसिद्ध झाली होती. अशाच प्रकारचा प्रश्न आता बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी उपस्थित केला आहे. तशा नीना गुप्ता या आपल्या बिनधास्त आणि स्पष्टवक्तेपणा बद्दल चांगल्याच प्रचलित आहेत. या वेळेलाही त्यांनी महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने एका महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वळवले. इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करुन त्यांनी विचारले आहे की, “पुरुषच खुलेआम गॅस सोडू शकतात का? महिलांनाही पोटाची समस्या असते. मग महिलांनीही बिनधास्त तो सोडून द्यावा.”

इन्स्टा व्हिडिओवर नीना गुप्ता म्हणतात की, “सार्वजनिक जीवनात महिलांनी कसे राहावे, याबाबत सतत सांगितले जाते. प्रत्येकवेळी चांगले राहण्याचा महिलांवर दबाव असतो. सध्या लॉकडाऊन सुरु आहे. महिला कुटुंबासाठी जेवण बनविण्यात व्यस्त आहेत. घरातच बसून असल्यामुळे जास्त खाल्लेल जेवण पचत नाही. अशावेळी महिलांना देखील गॅस होतो. ढेकर येतो. फक्त पुरुषांनीच खुलेआम गॅस सोडणे आणि ढेकर देणे हा काही नियम नाही. महिलांनी देखील बिनधास्त गॅस सोडावा, ढेकर द्यावा आणि जसं वाटतंय तसं बसावं.”

“पुरुषांना ज्या गोष्टी कराव्याश्या वाटतात, त्या ते बिनधास्त करतात. मग महिलांनी का करु नये? महिलांना देखील अधिकार आहेत. महिला या गोष्टी दाबण्याचा प्रयत्न करतात. पण का? अस्वस्थ राहून कशाला जगायचं? तुम्हीही तुम्हाला जे वाटतं ते बिनधास्त करा.”, असा सल्ला नीना गुप्ता यांनी दिला आहे.

नीना गुप्ता यांच्या या प्रश्नावर त्यांच्या चाहत्यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. एका चाहत्याने कमेंटमध्ये सांगितले की, मस्तच. मी तुमच्या विचारांना समर्थन देतो. तुम्ही खरं बोलला आहात. दुसऱ्या एका कमेंटमध्ये एकजण बोलतो की, “लोकांनी आता या गोष्टी सहजगत्या घेतल्या पाहीजेत.”

नीना गुप्ता सध्या त्यांच्या पतीसोबत मुक्तेश्वर येथे राहत आहेत. दोघेही एका ठिकाणी फिरायला गेले होते, मात्र लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. नीना गुप्ता यांचा शुभ मंगल ज्यादा सावधान हा चित्रपट नुकताच रिलीज झाला होता. बधाई हो सारखाच या चित्रपटातही सामाजिक मुद्दा उचलण्यात आला होता. चित्रपटसृष्टीत पुन्हा पदार्पण केल्यापासून विविध सामाजिक विषयावर हलक्या फुलक्या पद्धतीतले सिनेमे त्यांनी केले आहेत.

First Published on: April 25, 2020 6:16 PM
Exit mobile version