पाकिस्तान १५ ऑगस्ट ऐवजी १४ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन का साजरा करतो?

पाकिस्तान १५ ऑगस्ट ऐवजी १४ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन का साजरा करतो?

पाकिस्तान १४ ऑगस्ट रोजी साजरा करतो स्वातंत्र्यदिन

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळाली. यावर्षी भारत ७४ स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. ब्रिटिशांकडून भारतासोबतच पाकिस्तानलाही १५ ऑगस्ट रोजीच स्वातंत्र्य प्राप्त झाले होते. दोन्ही देशांमध्ये झालेल्या फाळणीतून पाकिस्तानची निर्मिती झाली. यावेळी सीमेवरील हजारो नागरिकांना त्याच्या यातना भोगायला लागल्या होत्या. मात्र पाकिस्तान १५ ऐवजी १४ ऑगस्टलाच स्वातंत्र्यदिन साजरा करतो. यामागे अनेक कारणे असल्याचे बोलले जाते. त्याचाच घेतलेला हा थोडक्यातला आढावा.

भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७ (The Indian Independence Act of 1947) नुसार दोन्ही देशांचा जन्म एकाच दिवशी झाला होता. “१५ ऑगस्ट १९४७ रोजी दोन स्वतंत्र देशांची घोषणा करण्यात येत आहे. त्यापैकी एक भारत आणि पाकिस्तान आहे.” अशी कायद्याची ओळख यात करुन दिलेली आहे. पाकिस्तानचे निर्माते आणि ज्यांना पाकिस्तानचा राष्ट्रपिता म्हटले जाते ते मोहम्मद अली जिना यांनी देखील १५ ऑगस्ट रोजीच पाकिस्तान रेडिओवरुन आपले भाषण दिले होते. त्यात ते म्हणतात, ऑगस्ट १५ पासून पाकिस्तान हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. मुस्लिम राष्ट्र घडविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आहुती दिली त्यांचे हे हक्काचे घर आहे.”

तरिही १४ ऑगस्टलाच स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे पाकिस्ताकडे धार्मिक कारण होते. १९४७ मध्ये १४ ऑगस्ट रोजी रमजानचा शेवटचा शुक्रवार येत असून तो २७ वा दिवस होता. इस्लामीक कॅलेंडरनुसार हा दिवस पवित्र मानला जातो. याच दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा केल्यास देशवासियांच्या उत्साहात भरच पडेल. यासाठी याच दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे ठरले.

दुसरे कारण म्हणजे पाकिस्तानला वेगळे राष्ट्र म्हणून १४ ऑगस्ट रोजी स्वीकृती मिळाली होती. तसेच १५ ऑगस्टच्या मध्यरात्री भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांना दोन्ही देशांना सत्ता हस्तांतरीत करायची होती. एकाच वेळी दोन्ही देशामध्ये उपस्थित राहणे शक्य नव्हते. कारण पाकिस्तानची राजधानी कराची असून जिना तिथे होते. तर भारताची राजधानी दिल्ली होती. यातून पर्याय निघाला की माऊंटबॅटन यांनी कराचीमध्येच सत्ता हस्तांतरीत करावी.

माऊंटबॅटन हे १३ ऑगस्टला पाकिस्तानात पोहोचेल आणि त्यांनी १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या संसदेत भाषण करताना उद्या पाकिस्तान सरकारच्या ताब्यात हा देश दिला जाईल, असे सांगितले. त्यामुळे १५ ऑगस्ट हाच स्वातंत्र्यदिन असल्याचे जाहीर होते. मात्र त्यानंतर आम्हाला १४ ऑगस्ट रोजी सत्ता हस्तांतर झाली असे सांगत काहींनी १४ ऑगस्ट हाच स्वातंत्र्यदिन मानायला सुरुवात केली.

First Published on: August 14, 2020 4:43 PM
Exit mobile version