World Toilet Day : टॉयलेट शब्दाचा अर्थ शौचालय नव्हेच; ते तर…!

World Toilet Day : टॉयलेट शब्दाचा अर्थ शौचालय नव्हेच; ते तर…!

१९ नोव्हेंबर म्हणजे वर्ल्ड टॉयलेट डे! हल्ली Toilet हा शब्द सगळीकडेच प्रचलित झाला आहे. पण तो मूळ इंग्रजी शब्द नाही हे तुम्हाला माहिती आहे का? आणि त्याहून पुढची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे टॉयलेटचा मूळ अर्थ ‘संडास’ किंवा ‘शौचालय’ असा नाहीच! मग शौचालयासाठी Toilet हाच शब्द कसा काय रुढ झाला? कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, की Toilet या शब्दाला किमान ३०० ते ४०० वर्षांचा इतिहास आहे. हा शब्द मूळ फ्रेंच शब्द असलेल्या Toile चं इंग्रजी मूल आहे. आणि त्याचा अर्थ आहे ‘कपड्याचा तुकडा’! चक्रावलात ना?

टॉयलेट म्हणजे होतं कपडे गुंडाळण्याचं कापड!

टॉयलेट होतं एक कापड!

फ्रेंच भाषेमध्ये Toilette चा अर्थ होतो कपड्याचा छोटा तुकडा. ब्रिटिशांनी त्याचं इंग्रजी व्हर्जन टॉयलेट असं घेतलं. १६व्या शतकात या शब्दाचा वापर इतर कपड्यांना गुंडाळण्यासाठी वापरण्यात येणारा कापडाचा तुकडा अशा अर्थाने केला जायचा. त्यानंतर काही काळाने केस विंचरताना किंवा दाढी करताना खांद्यावर ठेवायचं कापड म्हणून टॉयलेट या शब्दाता वापर केला जाऊ लागला. मध्यंतरी काही वर्ष लोटल्यानंतर हे कापड खांद्यावरून ड्रेसिंग टेबलवर आलं आणि ड्रेसिंग टेबलचा कव्हर म्हणून टॉयलेट शब्द वापरला जाऊ लागला.

ड्रेसिंग टेबलवरच्या कपड्यालाही टॉयलेटच म्हणत!

कापडाचा झाला मेकअप!

हळूहळू ड्रेसिंग टेबलवरून टॉयलेटचा अपभ्रंश होऊन कपडे-मेकअप, साफसफाई अशी पूर्ण तयारी करण्याच्या प्रक्रियेलाच इंग्रज लोकं टॉयलेट म्हणू लागली. तो काळ होता १८व्या शतकाच्या शेवटाचा(१७५० ते १८००). ‘संध्याकाळच्या पार्टीसाठी ती तिची टॉयलेट करण्यात व्यस्त झाली’, असं ही लोकं म्हणू लागली होती. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात (१८०० ते १८५०) मेकअप किंवा केस विंचरण्याची प्रक्रिया गळून पडून साफसफाई किंवा स्वच्छता एवढ्याच अर्थाने टॉयलेट शब्दाचा वापर होऊ लागला. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात (१८५० ते १९००) डॉक्टरांनी टॉयलेट शब्दाचा वापर शस्त्रक्रियेनंतर स्वच्छता करण्याच्या प्रक्रियेसाठी देखील वापरायला सुरुवात केली होती.

…आणि शेवटी कापडाचं झालं टॉयलेट!

…आणि शेवटी मेकअपचं झालं ‘टॉयलेट’!

दरम्यान, १८व्या शतकामध्येच अमेरिकेच टॉयलेट हा शब्द मेकअप, केस विंचरण्याची किंवा तयारी करण्याची प्रक्रिया इथपर्यंतच मर्यादित न राहाता तयारी करण्याच्या जागेसाठी किंवा खोलीसाठी वापरला जाऊ लागला. अमेरिकेमध्ये सामान्यपणे अशा खोल्यांमध्येच शौचाचं भांडं असायचं. त्यामुळे कालांतराने अशा खोल्यांना लोकं टॉयलेट म्हणू लागली. आणि सरते शेवटी खोल्यांवरून थेट शौचाच्या भांड्यालाच टॉयलेटचं नाव पडलं. त्यामुळे आजच्या Toilet चा प्रवास हा फ्रान्समधल्या १६व्या शतकातल्या Toilette पासून अर्थात कापडाच्या तुकड्यापासून झाला आहे!

First Published on: November 19, 2019 1:42 PM
Exit mobile version