परळच्या सीजीएसटी इमारतीची परांची कोसळून उद्योजक गंभीर जखमी

परळच्या सीजीएसटी इमारतीची परांची कोसळून उद्योजक गंभीर जखमी

जीएसटीचे कार्यालय असलेल्या इमारतीच्या डागडुजीसाठी बांधण्यात आलेली लोखंडी परांची वाऱ्याने कोसळून झालेल्या दुर्घटनेत कृषी उत्पादन कंपनीचे संचालक गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी परळच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल कऱण्यात असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी इमारतीच्या मालकासह कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या संचालकांवर केंद्रीय वस्तू सेवा कर(सीजीएसटी) विभागात डिसेंबर २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात त्याचा जबाब घेण्यासाठी येथील सीजीएसटी कार्यालयात बोलावण्यात आले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

कोण आहे राहुल सराफ?

राहुल सराफ (३५) असे या गंभीर जखमी असलेल्या उद्योजकाचे नाव आहे. राहुल सराफ हे जे. व्ही. पी. डी स्कीम, विलेपार्ले येथे राहणारे आहेत. राहुल यांचे वडील राजेंद्र सराफ यांची कृषी उत्पादन कंपनी आहे. या कंपनीचे राहुल हे एक संचालक आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये राहुल यांच्यावर केंद्रीय वस्तू सेवा कर विभागाने गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यासंदर्भात गुरुवारी त्यांना परळ रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या ‘लोटस इन्फो सेंटर’ या इमारतीत असलेल्या केंद्रीय वस्तू सेवा कर (सीजीएसटी) या कार्यालयात जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले होते.

राहुल सराफ

ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

राहुल हे दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास ‘लोटस इन्फो सेंटर’ या इमारतीत प्रवेश करताच इमारतीच्या डागडुजीसाठी बांधण्यात आलेली लोखंडी परांची वाऱ्यामुळे कोसळून राहुल सराफ हे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांना तात्काळ केईएम हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्यांना जवळच असलेल्या ग्लोबल या खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या डोक्यात लोखंडी बांबूचा प्रहार झाल्यामुळे त्याच्या मेंदूला मार लागला. राहुल सराफ अद्याप शुद्धीवर आलेले नसून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी ‘लोटस इन्फो सेंटर’ या इमारतीचे मालक आणि कंत्राटदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला करण्यात आला असून तपास सुरु आहे.

First Published on: June 14, 2019 10:49 PM
Exit mobile version