तुंगारेश्वर नदीवर नगरसेवकाने बांधला आदिवासींसाठी साकव

तुंगारेश्वर नदीवर नगरसेवकाने  बांधला आदिवासींसाठी साकव

साकव

तुंगारेश्वर नदीवर साकव बांधून शासनाऐवजी एका नगरसेवकानेच आदिवासी ग्रामस्थांच्या दैनंदिन कामे,सुविधा,रोजगार,शेती आणि शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. या साकवामुळे आता बाराही महिने येथील ग्रामस्थ शहराशी जोडले जाणार आहेत.वसईच्या पूर्वपट्टीतील सातीवली-तुंगारेश्वर डोंगर बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम, शंकराचे मंदिर आणि पावसाळ्यातील धबधब्यांसाठी सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातो. हजारो पर्यटक या ठिकाणी नेहमी येत असतात. येथील दुथडी भरून वाहणारी नदी आणि धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत असतात. मात्र,या परिसरातील ग्रामस्थांचा नदीवर पुल नसल्यामुळे शहरांशी संपर्क तुटतो. त्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. ग्रामस्थांना शेतावर, रोजंदारीवर आणि विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाता येत नाही.

तुंगारेश्वर नदीवर साकव बांधून देण्याची मागणी आदिवासी बांधव सातत्याने करत होते. या मागणीची शासन दरबारी कोणतीच नोंद घेण्यात येत नव्हती. ही व्यथा त्यांनी नगरसेवक सुनील आचोळकर यांच्यापुढे मांडली. आचोळकर यांनी लागलीच पाहणी करून महापालिकेच्या माध्यमातून आलेल्या सिमेंट पाईपचा साकव तयार केला. त्यासाठी लागणारी इतर मदत आचोळकर यांनी स्वतः केली.त्यामुळे येथील ग्रामस्थांचा आता बाराही महिने शहराशी संपर्क राहणार आहे.

साकव पूर्ण झाल्यामुळे आदिवासी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. पावसाळ्यात आपली शाळा बुडणार नाही म्हणून मुलेही खूश झाली आहेत. तर आपला शहरांशी सतत संपर्क राहणार असल्यामुळे मोठ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. आता पावसाळ्यातही आम्ही बाजारहाट करु शकू, मुलांना शाळेच धाडू असे सकुबाईने सांगितले.तर पावसाळ्यात नदीचे पाणी वाढले तरी आम्हाला शेतावर जाता येईल, असा विश्वास लक्ष्मण बापू याने साकव पाहून व्यक्त केला.आचोळकर यांनी साकव बांधून दिल्यामुळे आमचा दुवा त्यांना मिळेल, अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

तर मी फक्त वसई-विरार महापालिकेच्या माध्यामातून माझे कार्य केले. पालिकेच्या पाईपाने साकव तयार केला.आता त्यावर संरक्षण रेलिंग लवकरच उभारण्यात येईल.त्यामुळे ग्रामस्थांना सुरक्षितरित्या नदी ओलांडता येईल, असे आचोळकर यांनी सांगितले.

First Published on: November 24, 2018 5:36 AM
Exit mobile version