देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ८० तासांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केला. त्यांच्यासोबत भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी भुपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते.(छाया ः दीपक साळवी)

 सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारला बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लाइव्ह बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देताच राज्यात नाट्यमय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी मंगळवारी सकाळपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनधरणी करण्यास सुरूवात केली. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षात परतावे म्हणून गळ घालण्यात आली. त्यांच्या या सांघिक प्रयत्नांना यश मिळाल्याने शनिवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी दुपारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा फडणवीस यांच्याकडे दिला. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असताना बहुमताचे आकडे जुळवू न शकल्याचे सांगत संध्याकाळी ४ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आपलाही राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे आपोआपच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.महाराष्ट्र विकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक रात्री ८ वाजता हॉटेल ट्रायडंटमध्ये झाली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आघाडीचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री निवडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तो एकमताने संमत झाल्यानंतर उपस्थितांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आघाडीच्या नेत्यांसह आदित्य ठाकरे राजभवनावर गेले. दरम्यान रात्री ९.३० वाजता अजित पवार पुन्हा शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्व्हर ओकवर गेल्याने राजकारणाने पुन्हा एकदा यु टर्न घेतला आहे. अजितदादा पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता वाढल्याने भाजपच्या गोटात शांतता पसरली आहे.

महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाने मंगळवारी नवे वळण घेतले. सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगितले असताना बहुमताचे आकडे जुळवू न शकल्याने आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे नव्या सरकारकडे बहुमत उरलेले नाही.

त्यामुळे आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडताना राज्यातील जनतेचे आभारही मानले. त्यानंतर राजभवनावर जाऊन त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला.आमच्याकडे बहुमत नसल्यामुळे विरोधी पक्षात बसणार हे आम्ही अगोदरच जाहीर केले होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसही बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चेचे गुर्‍हाळ सुरू ठेवले होते. त्यामुळे अजित पवार यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा एक गट आमच्याकडे आल्याने आम्ही त्यांच्या पाठिंब्यामुळे सरकार बनवले. आज सुप्रीम कोर्टाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश आम्हाला दिले. मात्र, सकाळी अजित पवार मला भेटले आणि त्यांनी काही कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले. अजित पवार यांनी माझ्याकडे उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आमच्याकडे संख्याबळ उरले नसल्याने मीही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच वेळात राज्यपालांना भेटून मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, जे लोक मातोश्रीवरून बाहेर पडत नव्हते, ते अनेकांच्या पायर्‍या झिजवू लागले आहेत. जनतेने भाजपला जनादेश दिला. कारण आम्ही ७० टक्के जागा जिंकलो, तर शिवसेना जितक्या जागा लढल्या होत्या त्याच्या केवळ ४० टक्के जागांवर विजय मिळविला. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार असे कधीही ठरले नव्हते. अनेक दिवस त्यांची वाट पाहिली; पण त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम हा फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हा आहे. महाशिवआघाडीचे सरकार हे त्यांच्याच ओझ्याखाली येईल. हे तीन चाकांचे सरकार आहे. तीन चाके तीन दिशांना धावायला लागले तर त्याचे काय होते, तेच या सरकारचे होईल ही आम्हाला भीती वाटते, असेही ते म्हणाले. तर शिवसेनेने स्वत:चे हसे करून घेतले, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगाविला.

अजित पवारांची मनधरणी केली कोणी
अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. यासाठी अनेक नेत्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. मंगळवारी सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबईत सकाळपासून अजित पवार हे ट्रायडंट हॉटेलमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यानंतर सदानंद सुळे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतरच अजित पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

आतापर्यंतचे औटघटकेचे मुख्‍यमंत्री

१) बीएस येडियुरप्पा (कर्नाटक) -१७ ते १९ मे २०१८ (२ दिवस)
२) देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र) – २३ ते २६ नोव्हेंबर २०१९ (३ दिवस)
३) जगदंबिका पाल (उत्तर प्रदेश) -२१ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी १९९८ (३ दिवस)
४) सतिश प्रसाद सिंह (अंतरिम-बिहार)- २८ जाने ते १ फेब्रुवारी १९६८ (४ दिवस)
५) ओमप्रकाश चौटाला (हरयाणा) -१२ ते १७ जुलै १९९० (५ दिवस)
६) एससी मारक (मेघालय) – २७ फेब्रुवारी ते ३ मार्च १९९८ (६ दिवस)
७) नितीश कुमार (बिहार) – ३ ते १० मार्च २००० (७ दिवस)
८) बीएस येडियुरप्पा (कर्नाटक) -१२ ते १९ नोव्हेंबर २००७ (७ दिवस)
९) पी. के. सावंत (महाराष्ट्र)-25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963 (9 दिवस)
१०) शिबू सोरेन (झारखंड) – २ मार्च ते १२ मार्च २००५ (१० दिवस)
११) एससी मारक (मेघालय) – २७ फेब्रुवारी ते १० मार्च १९९८ (११ दिवस)
१२) ओमप्रकाश चौटाला (हरयाणा) – २१ मार्च ते ६ एप्रिल १९९१ (१६ दिवस)
१३) जानकी रामचंद्रन (तामिळनाडू) – ७ ते ३० जानेवारी १९९८ (२३ दिवस)
१४) बिंदेश्वर प्रसाद (बिहार) – १ फेब्रुवारी ते २ मार्च १९६८ (३० दिवस)
१५) चौ. मोहम्मद कोया (केरळ) -१२ ऑक्टो ते १ डिसेंबर १९७९ (४५ दिवस)

First Published on: November 27, 2019 7:18 AM
Exit mobile version