गेट परीक्षा फेब्रुवारी २०२१ मध्ये

गेट परीक्षा फेब्रुवारी २०२१ मध्ये

आयआयटी मुंबईकडून घेण्यात येणारी ‘गेट २०२१’ ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी आवश्यक असलेली ही परीक्षा यंदा वेगवेगळ्या टप्प्यात घेण्यात येणार असल्याचे परीक्षा समितीचे प्रमुख आयआयटी मुंबईचे प्रा. दीपांकर चौधरी यांनी स्पष्ट केले.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी होणारी ही परीक्षा ५ ते ७ फेब्रुवारी आणि १२ ते १४ फेब्रुवारी अशा सहा दिवसांमध्ये होणार आहे. यंदा या परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्यात आले आहे तर पात्रता निकष शिथील केले आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांना बारावीनंतर पदवी शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक होते. आता अखेरच्या वर्षाच्या परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांनाही संधी दिली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे गुण वाढवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे यंदा ‘पर्यावरण विज्ञान आणि इंजिनीअरिंग’ आणि ‘ह्युमॅनिटीज अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस’ या दोन विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे परीक्षेसाठी २७ विषय असणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे असे मतही चौधरी यांनी व्यक्त केले. देशभरातील आयाआयटी तसेच इतर विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या कक्षा रुंदावणार असल्याचा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

First Published on: July 26, 2020 6:11 PM
Exit mobile version