पुन्हा भारतच ‘सुपर’; चौथ्या टी-२० सामन्यातही न्यूझीलंडवर मात   

पुन्हा भारतच ‘सुपर’; चौथ्या टी-२० सामन्यातही न्यूझीलंडवर मात   

चौथ्या टी-२० सामन्यातही न्यूझीलंडवर मात   

न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी असल्यामुळे भारताने वेलिंग्टनला झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात संघात तीन बदल केले. मागील सामन्यातील मॅचविनर रोहित शर्मालाही या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली. मात्र, याचा निकालावर फरक पडला नाही. तिसऱ्या सामन्याप्रमाणेच चौथा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि यात भारताने १ चेंडू शिल्लक राखून विजय मिळवला. भारताची सुपर ओव्हर खेळण्याची आणि जिंकण्याची सलग ही दुसरी वेळ होती. चौथ्या सामन्यात दोन्ही संघांनी २० षटकांत १६५-१६५ धावा केल्या. त्यामुळे सामन्याचा विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
मागील सामन्याप्रमाणेच सुपर ओव्हर टाकण्याची जबाबदारी कर्णधार विराट कोहलीने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर सोपवली. त्याच्या या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर न्यूझीलंडच्या टीम सायफर्टने ८ धावा काढल्या. मात्र, चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो माघारी परतला. पुढील दोन चेंडूंवर कॉलिन मुनरोने पाच धावा केल्याने न्यूझीलंडने १ बाद १३ अशी मजल मारली. याचा पाठलाग करण्यासाठी रोहितच्या अनुपस्थितीत कर्णधार कोहली आणि लोकेश राहुल ही जोडी मैदानावर आली. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊथीने टाकलेल्या या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर राहुलने षटकार आणि चौकार लगावला, पण पुढच्या चेंडूवर तो बाद झाला. मात्र, कोहलीने संयमाने खेळ करत चौथ्या चेंडूवर दोन धावा काढून आणि पाचव्या चेंडूवर चौकार लगावून भारताला विजय मिळवून दिला.

मनीष पांडेने सावरले

वेलिंग्टनला झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत साऊथीने न्यूझीलंडच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. या सामन्यात भारताने रोहित, रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राहुलसह संजू सॅमसनला भारताच्या डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. मात्र, त्याला या संधीचा फारसा फायदा घेता आला नाही. स्कॉट कुगलायनने त्याला ८ धावांवर बाद केले. कर्णधार कोहली (११), श्रेयस अय्यर (१) आणि शिवम दुबे (१२) यांनाही फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. राहुलने २६ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा केल्यावर त्याला लेगस्पिनर ईश सोधीने मिचेल सँटनरकरवी झेलबाद केले. मनीष पांडेने मात्र संयमाने खेळ करत ३६ चेंडूत ३ चौकारांसह ५० धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने २० षटकांत ८ बाद १६५ अशी धावसंख्या उभारली.

मुनरो, सायफर्टची अर्धशतके 

१६६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलला अवघ्या ४ धावांवर बुमराहने माघारी पाठवले. मात्र, मुनरो आणि सायफर्ट या दुसऱ्या जोडीने ७४ धावांची भागीदारी रचत न्यूझीलंडचा डाव सावरला. मुनरोने ३८, तर सायफर्टने ३२ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. अखेर कोहलीने मुनरोला ६४ धावांवर धावचीत करत ही जोडी फोडली. पुढे सायफर्टला रॉस टेलरची उत्तम साथ लाभली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडला अखेरच्या षटकात जिंकण्यासाठी ७ धावांची आवश्यकता होती. शार्दूलने या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टेलरला (२४) बाद केले. पुढील चेंडूवर डॅरेल मिचेलने चौकार लगावला, पण पुढील चेंडूवर यष्टीरक्षक राहुलने सायफर्टला (५७) धावचीत केले. त्यामुळे अखेरच्या तीन चेंडूंवर न्यूझीलंडला जिंकण्यासाठी ३ धावांची गरज होती. मात्र, त्यांनी २ विकेट गमावत २ धावाच केल्याने नियमित सामना बरोबरीत संपला.
First Published on: January 31, 2020 6:06 PM
Exit mobile version