शिवसेना, भाजपनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक मैदानात

शिवसेना, भाजपनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक मैदानात

प्रातिनिधिक छायाचित्र

देशात आणि राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे सर्वच पक्ष सतर्क झाले आहेत.भाजपने अगोदरच ‘वन बुथ वन नेशन‘ या नावाखाली पक्ष बांधणी सुरू केली असून त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. गेल्या बेलापूर विधानसभा निवडणुकीत अत्यंत कमी फरकाने हरणारे विजय नाहटा हे पुन्हा त्याच प्रभागातून सक्रीय झाले आहेत. त्यांनी कार्यक्रमांचा सपाटाच लावला आहे. आता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षही मैदानात उतरला आहे. नवी मुंबईचा विकास नाहटांनी केला आहे असे काही नेते सांगत असतील तर मुंबईचा विकास उद्धव ठाकरेंनी केला की मुंबईच्या पालिका आयुक्तांनी केला हे सांगावे? असा खडा सवाल करीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आढावा बैठकीत नहाटांचा समाचार घेतला.

देशात मोदी लाटेमुळे केंद्र आणि राज्यात सत्तांतर झाले. सत्तेवर आल्यानंतर मागील साडेचार वर्षांत मोदी सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. मोदी लाटेला मोडून काढण्याचे पहिले काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत गणेश नाईक यांनी केले. त्यामुळेच नवी मुंबईचे नाव देशात झळकले आहे. गणेश नाईक यांचा नवी मुंबई विकासाचा पॅटर्न आता सर्वत्र राबविणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवकचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत केले.आगामी कालावधीतील निवडणुका पाहता कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि लोकनेते गणेश नाईक यांचे विचार, व्हिजन त्याचबरोबर आपल्या लोकप्रतिनिधींनी केलेली कामे जनतेसमोर पोहोचवावीत, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव नाईक यांनी केले. खोटी आश्वासने देणार्‍या भाजपा सरकारला त्यांची जागा दाखविण्याची आता योग्य वेळ आली आहे, असे सांगत राष्ट्रवादीच्या सर्व सेलच्या पदाधिकार्‍यांनी आत्तापासूनच आपल्या प्रभागातून बांधणी करुन संपर्क वाढविण्याचे कार्यकर्त्यांना सूचित केले.नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांची घरे कायम अधिकृत व्हावी ही लोकनेते गणेश नाईक यांची पोटतिडकीची मागणी काही द्वेषींनी चुकीच्या पध्दतीने प्रकल्पग्रस्तांपुढे मांडली आहे. जर ठाण्यात सत्तेवर असणारे क्लस्टरचे स्वागत करतात तर मग नवी मुंबईत वेगळी भूमिका का घेतात? ही त्यांची दुटप्पी भूमिका असून त्याचे सत्य आता जनतेसमोर आले आहे.

१ लाख युवकांची मंत्रालयावर धडक

दोन कोटी युवकांना रोजगार देऊ, असे सांगणार्‍या सत्ताधार्‍यांनी एक लाख युवकांना तरी रोजगार दिला का? हे पाहावे. राज्यातील उद्योगधंदे बंद पडत असून बेरोजगारी वाढत आहेत. सेवा परिक्षेच्या एक लाख जागा आजही रिक्त आहेत. सरकार त्या जाणीवपूर्वक भरत नाही. त्यामुळे या सरकारचा युवकांकडून निषेध करण्यात येणार असून येत्या नोव्हेंबर महिन्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तरुणांना एकत्र करुन एक लाख युवकांचा महामोर्चा मंत्रालयावर काढणार असल्याचे युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी सांगितले.

First Published on: September 10, 2018 1:11 AM
Exit mobile version