२२ मेपासून नवे लॉकडाऊन नाही; अफवांमुळे संभ्रम

२२ मेपासून नवे लॉकडाऊन नाही; अफवांमुळे संभ्रम

२२ मेपासून नवे लॉकडाऊन नाही; अफवांमुळ संभ्रम

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात रेड झोन, कंटेनमेंट झोन वगळता दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू करण्यासाठी निर्बंध शिथील करण्यात येत असताना नाशिक जिल्ह्यात २२ मेपासून अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णतः लॉकडान करण्यात येणार असल्याचे मेसेज सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. यामुळे जिल्हावासियांमध्ये पुन्हा एकदा घबराट निर्माण झाली आहे. मात्र, शासनाच्या निर्देशानुसार निर्बंध शिथील करण्यात येत असून अशा प्रकारचा कोणताही निर्णय प्रशासनाने घेतला नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले.

गेल्या दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व व्यवहार ठप्प असून सर्व नागरिक घरातच अडकून पडले आहेत. त्यामुळे आता सर्वजण बाहेर पडण्यासाठी बैचेन झाले असून लॉकडाऊन कधी उठवणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या काळात सर्वच दुकाने, उद्योगधंदे बंद राहिल्याने अर्थचक्र ठप्प तर झालेच शिवाय अनेकांच्या हाताला काम नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. कामानिमित्त महाराष्ट्रात आलेले परप्रांतीय मजूर हाताला काम नसल्याने पुन्हा आपल्या मुळगावी परतू लागले आहेत. एकूणच परिस्थिती पाहता आता लॉकडाऊन लवकर उठवून पुन्हा दैनंदिन व्यवहार पूर्ववत व्हावेत, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. त्यातच लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. तसेच रेड झोनमध्ये कंटेनमेंट झोन वगळून एकल दुकाने सुरू करण्यात आली. मात्र, दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी वेळेचे निर्बंध टाकण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वचजण घरीच असल्याने सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे या काळात सोशल मीडियाचा गैरवापर होऊन विविध संदेश व्हारयल होत आहेत. अशाच प्रकारचा एक संदेश बुधवारी सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २२ ते ३१ मेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णतः लॉकडाऊन करण्यात येत असल्याचा हा मेसेज व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे काही नागरिकांनी आपल्या जवळच्या नातेवाईक, मित्र तसेच प्रसार माध्यमांच्या कार्यालयात फोन करून याबाबत खात्री करून घेत होते. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही आदेश काढण्यात आले नसून सायंकाळी ७ ते सकाळी ७ संचारबंदी लागू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

आदेश काढलेले नाहीत

शासनाने रेड आणि नॉन रेड असे दोनच झोन जाहीर केले असून या झोनमध्ये कोणत्या सेवा सुरू आणि कोणत्या सेवा बंद राहतील याबाबत स्पष्ट केले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आदेश काढले आहेत. पूर्णतः लॉकडाऊनबाबत कोणतेही आदेश काढलेले नाहीत.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

First Published on: May 20, 2020 9:14 PM
Exit mobile version