परळ-एल्फिन्स्टनचा नवा पादचारी पूल शनिवारपासून सुरु!

परळ-एल्फिन्स्टनचा नवा पादचारी पूल शनिवारपासून सुरु!

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानक (सौजन्य- दी एशियन एज)

परळ आणि एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकांवरील नवा पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. रेल्वे प्रशासनाने तशी माहिती जाहीर केली आहे. या नव्या पुलामुळे परळ स्थानकावरील जून्या पादचारी पुलावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. गेल्या दोन वर्षांपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना या पुलाची प्रतीक्षा आहे. सध्या या रेल्वेस्थानकावर चर्चगेटच्या दिशेला उतरणारा केवळ एकच पादचारी पूल आहे. दोन्ही दिशेच्या लोकलमधील प्रवासी या एकाच पुलाचा वापर करतात, त्यामुळे या पुलावर दिवसभर गर्दी असते. या पूलावर सर्वाधिक गर्दी असल्याने दिवसभर हा पूल रेल्वे पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवावा लागतो. सहा महिन्यांपुर्वी येथे परळ स्थानक ते फुलबाजार दरम्यान भारतीय लष्कराने पादचारी पूल उभारला. हा पूल स्थानकाच्या कल्याण दिशेकडे बांधला. या पुलाचा तुलनेने कमी वापर होतो. त्यामुळे चर्चगेट दिशेकडे एका पुलाची आवश्यकता होती. निविदा प्रक्रियेत खूप वेळ गेल्याने नवा पूल उभारण्यास वेळ गेला. परंतु नवा पूल लवकरच सुरू होणार असल्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेचे प्रवासी सुखावले आहेत.

कसा असेल नवा पूल?

नव्या पुलाची लांबी ७० मीटर असून रुंदी १२ मीटर आहे. नवा पूल रेल्वेच्या इतर पुलांपेक्षा प्रशस्त आहे. त्यामुळे या पुलावर गर्दीचे नियोजन करणे सोपे जाईल. स्थानकावर सध्या वापरात असलेला पूल १९७२ साली बांधलेला आहे. या पुलाची लांबी ३२ मीटर आणि रुंदी केवळ ५ मीटर आहे.

अखेर प्रतीक्षा संपली

नव्या पुलाला रेल्वे प्रशासनाने सप्टेंबर २०१६ मध्ये मंजुरी दिली होती. परंतु या पुलासाठी निविदा मागवण्यास पश्चिम रेल्वे प्रशासनाने खूप विलंब केला. तब्बल एका वर्षानंतर रेल्वेने पुलासाठी निविदा मागवल्या. २९ सप्टेंबर २०१७ रोजी येथील जून्या पुलावर प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये २३ प्रवाशांना जीव गमवावा लागला. नवा पूल वेळेत उभारला असता तर ही दुर्घटना टळली असती. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. दुर्घटनेमुळे जागे झालेल्या प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण करुन ७ नोव्हेंबर २०१७ रोजी पुलाचे काम सुरु केले. ८ महिन्यानंतर नव्या पुलाचे काम झाले असून ३० जून रोजी हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.

पुढील दोन-तीन दिवसांत पुलाचे काम पुर्ण होईल. पावसामुळे कामाला थोडा उशीर झाला. शनिवारपर्यंत काम पूर्ण करुन पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल. – रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

First Published on: June 27, 2018 1:30 PM
Exit mobile version