मेहबुबांच्या पीडीपीचे १४ आमदार फुटणार?

मेहबुबांच्या पीडीपीचे १४ आमदार फुटणार?

मेहबूबा मुफ्ती

जम्मू-काश्मीरची सत्ता गेल्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षातील (पीडीपी)आमदारांची चलबिचल सुरू झाली आहे. पीडीपीचे १४ आमदार पक्षातून फुटण्याच्या तयारीत आहेत. हे आमदार जाहीरपणे पक्षविरोधी बोलू लागले आहे. पक्ष नेतृत्त्वाकडून घराणेशाही जोपासली जात असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. मेहबूबा मुफ्ती या उघडपणे घराणेशाही जोपासत असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी त्यांचा भाऊ तसद्दुक सिद्दीकी यांना पर्यटन मंत्रीपद दिले होते. तर मुफ्ती यांचे मामा सरताज मदनी यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असूनही त्यांना मोठ्या प्रमाणात अधिकार देण्यात आले होते.

यामुळे पीडीपीचे अनेक आमदार नाराज आहेत. मुफ्ती यांच्याकडून घराणेशाहीला प्रोत्साहन दिले जात असल्याची उघड टीका बारामुल्लाचे आमदार जावेद हुसेन यांनी केली आहे. भाजप गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडला. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. सत्तेची ऊब संपल्यानं आता पीडीपीच्या आमदारांची नाराजी उघडपणे समोर येत आहे. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

पीडीपीचे 14 आमदार पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचे नाराज नेते आबिद अन्सारी यांनी म्हटले आहे. शिया नेते इमरान अन्सारी रजा यांनी गेल्याच आठवड्यात पीडीपी सोडत असल्याची घोषणा केली होती. गुलमर्गचे आमदार मोहम्मद वाणी यांनीही भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या मुद्यावरून पक्ष सोडण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पीडीपीमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला असून पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे.

First Published on: July 11, 2018 7:00 AM
Exit mobile version