नाणार आंदोलकांना भेटण्यास गेलेल्या पत्रकाराला पोलिसांकडून धक्काबुक्की

नाणार आंदोलकांना भेटण्यास गेलेल्या पत्रकाराला पोलिसांकडून धक्काबुक्की

मुंबई आझाद मैदान

नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आणि आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नागिरीमधील आंदोलक आझाद मैदान येथे आंदोलनासाठी बसले आहेत. या आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या दि हिंदुच्या पत्रकाराला काल पोलिसांनी धक्काबुक्की करत मैदानाबाहेर काढले. आलोक देशपांडे असे या पत्रकाराचे नाव आहे. आंदोलकाशी बातमीनिमित्त चर्चा करण्यासाठी ते जात असताना पोलिसांनी त्यांना वरिष्ठांच्या तोंडी आदेशाचा हवाला देत मैदानातून हुसकावून लावले. पत्रकारांना आंदोलकांशी बोलण्यापासून का रोखले गेल्यामुळे माध्यमवर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेटजवळ पत्रकाराला अडवले

आलोक देशपांडे यांनी ट्विटरवर याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. देशपांडे काल आझाद मैदानात गेले असताना, गेटजवळ पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांच्या बॅगेची तपासणी केली. त्यानंतर ते कोण आहेत? कशासाठी आत जात आहेत? याची चौकशी केली. देशपांडे पत्रकार असून ते नाणार आंदोलकांशी भेटायला जात असल्याचे समजताच पोलिसांचे पित्त खवळले. पोलिसांनी त्यांना खेचत बाहेर नेले आणि आंदोलकांची भेट घेता येणार नाही, असे सांगितले. देशपांडे यांनी जाब विचारताच, आम्हाला प्रश्न विचारू नका, वरिष्ठांचे तसे आदेश असल्याचे पोलीस उपनिरीक्षक जगनाथ गणगे यांनी देशपांडे यांना सांगितले.

पोलिसावर निलंबनाची कारवाई करा

दरम्यान, याप्रकरणाचा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निषेध नोंदवला आहे. हे प्रकरण वृत्तपत्र स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून आहे. जर पत्रकार यांना आंदोलनकर्त्यांना भेटण्यास मज्जाव केला जात असेल तर हे कितपत योग्य आहे असा सवाल आव्हाडांनी केला आहे. ज्या पोलीस अधिकार्‍याने देशपांडे याच्यावर हात उगारला आणि शिविगाळ केली अशा अधिकर्‍याची त्वरीत बदली करून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

First Published on: November 28, 2018 12:39 PM
Exit mobile version