करोनामुळे सोने ३ हजारांनी गडगडले, १२ वर्षात पहिल्यांदाच शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग ठप्प

करोनामुळे सोने ३ हजारांनी गडगडले, १२ वर्षात पहिल्यांदाच शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग ठप्प

सोन्याचे भाव पुन्हा गडगडले

भारतात करोना व्हायरसमुळे झालेल्या पहिल्या मृत्यूचा परिणाम हा शेअर बाजारावर तसेच सोने, चांदी यासारख्या मौल्यवान धातुंवरही पहायला मिळाला. तब्बल १२ वर्षानंतर पहिल्यांदाच शेअर मार्केटमधील ट्रेडिंग ठप्प झाल्याची नोंद आज शेअर बाजारात झाली. तब्बल ४५ मिनिटांसाठी निफ्टीचे ट्रेडिंग थांबले. मागील काही दिवसांपासून शेअर बाजार गटांगळी खात असून आठवड्याच्या अखेरच्या दिवशीही शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजार उघडताच निर्देशांकात तब्बल ३ हजार ९०.६२ अंकांची घसरण झाली असून राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९६६.१ अंकांची घसरण झाली आहे. तर सोन्यात देखील मोठी घसरण झाली आहे.

शेअर बाजारात मोठी घसरण

आज, शुक्रवारी शेअर बाजार उघडताच त्यात ३ हजार ९०.६२ अंकांची घसरण होऊन तो २९६८७.५२ अंकांवर पोहोचला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही ९६६.१ अकांची घसरण होऊन तो ८६२४.०४ अंकांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मार्च २०१८ नंतर १२ मार्च २०२० मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय शेअर बाजार १० हजाराच्या खाली आला होता. रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातले आहेत. तसेच सौदी अरेबिया आणि रशियात तेल दरावरुन युद्ध सुरु आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण झाली आहे. ही सुद्धा शेअर बाजार पडण्यामागील दोन प्रमुख कारणे आहेत. तर करोनामुळे आतापर्यंत देशात ७३ जणांना करोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याचा देखील फटका शेअर बाजारला बसला आहे.

सोन्याच्या दरात मोठी घसरण

करोना व्हायरसने जगभरात अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे सातत्याने शेअर बाजारात घसरण होताना दिसत आहे. त्यासोबतच सोन्याच्या दरात देखील घसरण आणि वाढ होत आहे. मात्र, आज सोन्यात मोठी घसरण झाली आहे. आज तोळ्याचा भाव ४१ हजार ६०० इतका आहे. तर गुरुवारी सोन्याचा भाव ४४ हजार ६०० रुपये इतका होता. त्यामुळे सोन्याचा भाव गुरुवारच्या तुलनेत ३ हजारांनी घसरला आहे.

भारतीय रूपयासाठी आणखी एक वाईट दिवस 

भारतीय रूपयाचे आज शुक्रवारीही मोठी घसरण झाली. भारतात करोनामुळे पहिला मृत्यू झाल्याची बातमी शिक्कामोर्तब झाल्यानेच भारतीय चलनावर याचा थेट परिणाम पहायला मिळाला आहे. करोनाच्या भीतीमुळेच गुंतवणुकदारांमध्ये कमालीची भीती पसरलेली आहे. आज सकाळीच रूपयाला ७४.३९ रूपये असा डॉलरच्या तुलनेत भाव मिळाला. याआधी ११ ऑक्टोबर २०१८ मध्ये रूपयाची अशी मोठी घसरण झाली. त्यावेळी रूपयाला ७४.४८ रूपये असा डॉलरच्या तुलनेत भाव मिळाला होता. या वर्षात आतापर्यंत ४.१ टक्के इतके रूपयाचे अवमूल्यन झाले आहे.

First Published on: March 13, 2020 10:22 AM
Exit mobile version