अखेर ‘त्या’ वाघाचा मृत्यू

अखेर ‘त्या’ वाघाचा मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील जूना कुनाडा गावात असलेल्या शिवना नदी पात्रातील दोन दगडांच्या फटीत अडकलेल्या वाघाचा अखेर मृत्यू झाला आहे. कालपासून वन विभागाकडून वाघाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. उशीरा रात्री बचाव कार्य थांबविण्यात आल्यानंतर आज सकाळी बचाव कार्य पुन्हा सुरु करण्यात आले. पण यावेळी नदी पात्रातील अडकलेला वाघ मृतावस्थेत आढळला. अडकलेला वाघ पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.

शिवना नदीत असा अडकला वाघ

पुलावरून उडी मारून जाण्याच्या प्रयत्नात शिवना नदीतील फटीत हा वाघ अडकून पडला होता. या अपघातात त्याला कमरेजवळ जखम झाल्याने तो जायबंदी झाला होता. शिवना नदी पात्रात वाघ अडकल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तातडीने वाघाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले.

असे सुरु होते बचावकार्य

शिवना नदी पात्रात ज्या ठिकाणी वाघ अडकला होता. त्याठिकाणी पोहोचणे सोपे नव्हते. त्यासाठी वनविभागाने क्रेनची मदत घेतली. क्रेनच्या सहाय्याने वनविभागाने पिंजरा नदीत सोडला. वाघासाठी पिंजऱ्यात कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान जखमी झाल्याने वाघाला चालता येत नव्हते. काही वेळानंतर वाघाने त्या दगडांच्या फटीमधून स्वतःची सुटका करुन घेतली. पण चालता येत नसल्याने तो बाजूच्या नाल्यात अडकला. काल सायंकाळी अंधार पडल्यानंतर वाघाला वाचवण्याचे प्रयत्न वनविभागाने थांबवले. आज सकाळी पुन्हा बचावकार्य सुरु करण्यात आले. यावेळी बचावकार्य सुरु करण्यापूर्वीच जखमी वाघ नदीत मृतावस्थेत आढळला.

First Published on: November 7, 2019 9:40 AM
Exit mobile version