पंढरपुरातल्या ‘प्रायव्हेट’ मंदिराचा व्हिडिओ व्हायरल!

साई बाबांचे शिर्डी संस्थान, अंबाबाईचे कोल्हापूरचे मंदिर, तिरूमलाचे तिरुपती बालाजीचे मंदिर किंवा मग देशातलं कोणतंही प्रसिद्ध मंदिर असो, प्रत्येक ठिकाणी होणारे पैशांचे व्यवहार कायमच चर्चेत आणि आरोप-प्रत्यारोपांमध्ये राहिले आहेत. कुठे रांग न लावता दर्शनासाठी हजारोंची ‘दक्षिणा’, तर कुठे पूजापाठ-नारायण नागबळी अशा नावांखाली होणारी देणग्यांची लूट. पंढरपुरातल्या एका छोट्या मंदिराचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दर्शनासाठी प्रत्येकी ५ रुपये!

या व्हिडिओमधलं हे मंदिर आहे छोटंसं, पण त्याच्या बाहेर बसलेल्या पुजाऱ्याचा तोरा मात्र मोठा आहे. या मंदिरासमोर भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली आहे. आणि हा पुजारी दर्शनासाठी प्रत्येकी ५ रुपये आकारत आहे. बरं जे भक्त त्याला पैसे देण्याला नकार देत आहे, त्यांना हा पुजारी मंदिरात जाऊच देत नाहीये. एका व्यक्तीने हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये शूट केला आहे.

व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीने ही सगळी मंदिरं पंढरपूर देवस्थानच्या अखत्यारीत येत असताना दर्शनासाठी पैसे कसे आकारले जात आहेत? असा प्रश्न केल्यानंतर ‘ते पंढरपूर देवस्थान आहे, हे मंदिर ‘प्रायव्हेट’ आहे’ अशा प्रकारचा उलट जबाब या पुजाऱ्यानं केल्यानं देव प्रायव्हेट कधीपासून झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

First Published on: August 12, 2018 12:03 PM
Exit mobile version