म्हणून ईडी प्रकरणावेळी शरद पवारांसोबत नव्हतो – अजित पवार

म्हणून ईडी प्रकरणावेळी शरद पवारांसोबत नव्हतो – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

शरद पवारांनी ज्या दिवशी ईडीच्या कार्यालयात ‘पाहुणचारा’साठी जाण्याचा निर्णय घेतला, नेमकं त्याच दिवशी अजित पवार त्यांच्यासोबत नव्हते. त्यानंतर लगेचच पवार कुटुंबामध्ये कलह असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान देखील अजित पवार फारसे दिसले नाहीत. त्याच्या संदर्भाने अजित पवार नाराज असून पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत असा तर्क काहींनी लावला. काहींनी तर अजित पवार भाजपच्या संपर्कात असल्याचंही म्हटलं. त्यावर आज पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी उत्तर दिलं. आपण त्या दिवशी पवारांसोबत का उपस्थित राहू शकलो नाही, याचं कारण अजित पवारांनी दिलं आहे.

कुठे होते अजित पवार?

ज्या दिवशी शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता, त्याच्या दोन दिवस आधी पुणे आणि बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आपण त्या दिवशी बारामधीमध्ये होतो, असं अजित पवार यावेळी म्हणाले. ‘शरद पवारांसोबत मी अशा वेळी उपस्थित राहणार नाही, असं होऊच शकत नाही. त्याच्या आदल्या दिवशी बारामतीमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे मी आणि माझे सहकारी आदल्या दिवशीच रवाना झालो होतो. तिथे संध्याकाळी उशिरापर्यंत आम्ही सगळ्यांनी काम केलं. रात्रीच आम्ही निघून येणार होतो. पण पावसामुळे रात्री निघणं शक्य झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही निघालो. पण मुंबईत येणाऱ्या टोल नाक्यावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. बाहेरून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मुंबईत येत होते. त्या प्रवासात अडकल्यामुळे मला इथे पोहोचायलाच दुपार झाली’ असं अजित पवार यावेळी म्हणाले.


हेही वाचा – ‘भाऊ भावाला गोळी घालतो, त्याला म्हणतात गृहकलह!’

कशाला आमच्या घरात भांडणं लावताय?

दरम्यान, यावेळी अजित पवारांनी पवार कुटुंबात मतभेद असल्याच्या वृत्ताचं जोरदार खंडन केलं. ‘आजही आम्ही शरद पवार जे सांगतील, ते ऐकतो. उगीच आमच्या घरात गृहकलह म्हणून कशाला भांडणं लावताय? मी जेव्हा राजकारणात आलो, सुप्रिया जेव्हा आली, पार्थ जेव्हा आला तेव्हा आणि आता रोहीत जर आला, तर त्याच्या नावाने देखील गृहकलह म्हणत चर्चा रंगवली जात आहे. पण तसं काहीही नाही’, असं यावेळी अजित पवार म्हणाले.

First Published on: September 28, 2019 5:17 PM
Exit mobile version