राष्ट्रवादीची कारवाई; अखेर अजित पवारांची हकालपट्टीच!

राष्ट्रवादीची कारवाई; अखेर अजित पवारांची हकालपट्टीच!

देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत अजित पवारांनी सकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेससोबत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी वाटाघाटी करत असतानाच अजित पवारांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधल्याच काही आमदारांना घेऊन थेट देवेंद्र फडणवीस आणि भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळेच शनिवारी भल्या सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवरच अजित पवारांवर पक्षाने कारवाई केली आहे.

दिलीप वळसे-पाटील नवे गटनेते

अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्याजागी दिलीप वळसे पाटील यांची विधिमंडळ गटनेतेपती निवड करण्यात आली आहे. तर जयंत पाटील यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात अजित पवारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वातावरण असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वायबी सेंटरमधल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, अजित पवारांच्या या कृत्याबद्दल पुढे त्यांच्यावर काय कारवाई करायची? याचे सर्वाधिकार शरद पवारांना देण्यात आल्याचं देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत ठरवण्यात आलं आहे.

अजित पवारांवर अखेर हकालपट्टीची कारवाई!

दरम्यान, वायबी सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला एकूण ४८ ते ४९ आमदार हजर असल्याचं समजत असून इतर आमदार अजूनही पोहोचले नसल्यामुळे हे आमदार अजित पवारांच्या गटात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या ११ आमदारांपैकी ५ आमदार परत पक्षाकडे आल्यामुळे आता अजित पवारांची काय भूमिका असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.


हेही वाचा – पहाटे ५.४७ वाजता हटवली राज्यातली राष्ट्रपती राजवट!
First Published on: November 23, 2019 8:07 PM
Exit mobile version