अरविंद सावंत देणार केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा

अरविंद सावंत देणार केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा

राज्यात सत्ता स्थापनेची संधी आज, सोमवारी शिवसेनेला देण्यात आली आहे. सर्वाधीक मताधिक्य मिळूनही भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश आले नसल्याने काल, रविवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दुसऱ्या क्रमांकावरील मताधिक्य असलेल्या शिवसेनेला ही संधी दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील सत्तेची गणित बदलणार असून त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. शिवसेनेला राज्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा हवा असेल, तर शिवसेनेने आधी एनडीएतून बाहेर पडावे, ही काँग्रेसची अट शिवसेनेने मान्य केल्याचे संकेत मिळत आहेत. याचे कारण म्हणजे शिवसेनेती केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अरविंद सावंत हे राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी आज, सोमवारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेत आहेत.

काय म्हणाले अरविंद सावंत 

शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का राहायचे?, असे ट्विट करत त्यांनी आपण केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत असे स्पष्ट केले आहे. आपला निर्णय जाहीर करताना सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर ताशेरे ओढले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचे सूत्र ठरले होते. दोन्ही पक्षांना हे सूत्र मान्य होते. आता हे सूत्रच नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. हा प्रकार महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत भाजपने महाराष्ट्रात फारकत घेतलीच आहे, अशा शब्दांत भाजपवर टीकास्त्र सोडत अरविंद सावंत यांनी युती तोडल्याचा दोष भारतीय जनता पक्षाला दिला आहे.

हेही वाचा –

भाजपने सोडला सत्ता स्थापनेचा दावा

First Published on: November 11, 2019 8:03 AM
Exit mobile version