साहेब टायमिंगच्या शोधात ?

साहेब टायमिंगच्या शोधात ?

‘टायमिंग’ राजकारणात महत्वाचे असते. ज्यांनी ज्यांनी टायमिंग साधले त्यांना राजकारणात सुगीचे दिवस आले. हल्लीच्याच पाच वर्षांच्या राजकारणाचे म्हणालं, तर काँग्रेसविरोधाचा फायदा घेत आणि इंटरनेट युगात योग्य ते टायमिंग साधत भाजपने मोदींना पुढे केले आणि पक्षाची भरभराट करून घेतली. त्यांचे आतापर्यंत टायमिंग एवढे अचूक आहे की, ‘घड्याळ’ बंद पाडण्याचा विडाच जणू त्यांनी उचलला आहे. दुसरीकडे शिवसेनेचे म्हणालं, तर मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा सेनेएवढा दुसर्‍या कोणाला झाला नसेल.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाला एकेकाळी मोठे खिंडार पडून देखील ज्याप्रमाणे पक्ष सत्तेच्या आणि राजकारणाच्या मुख्य झोतात ठेवला, त्यालाही संधीसाधू टायमिंगचीच जोड होती. आता उरले मनसेप्रमुख राज ठाकरे. मनसेची ही तिसरी विधानसभा निवडणूक. 2009 साली राज ठाकरेंच्या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत 13 आमदार निवडून आणले होते, 2014 साली मोदी लाटेत याच आमदारांची संख्या 1 वर आली, तो आमदार देखील शिवसेनेत गेला.

पक्षाच्या सुरूवातीपासूनच टायमिंगसाठी राज ठाकरे प्रसिद्ध होते. परंतु,2014 सालापासून त्यांचे हे टायमिंग बिघडलेले दिसते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ज्या दिवशी महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर केला, नेमकी त्याच दिवशी सेना आणि भाजपने युती तोडण्याची घोषणा केली आणि राज यांची ब्लू प्रिंट झाकोळली गेली. तरीही गेल्या 5 वर्षांच्या काळात त्यांनी टायमिंग साधण्याचा प्रयत्न केला, पण ‘अपना टाईम आयेगा’म्हणण्याच्या पलिकडे त्यांना विशेष काही करता आले नाही. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रभावीपणे मोदी आणि शहांविरोधात रान उठवले. परंतु, निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार न उतरवता त्यांनी दुसर्‍यांना हात आणि घड्याळालाच किल्ली दिल्याची चर्चा होती.

आता 4 महिन्यांनी विधानसभेसाठी महाराष्ट्रातील सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट अजून जोरात दिसली. वंचित बहुजन आघाडीचे तळ्यात,मळ्यात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने त्यांचा संसार पुन्हा थाटलाय. त्यामुळे राज ठाकरे हे सेना आणि भाजपच्या युतीच्या निर्णयापर्यंत थांबणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पक्षाला सत्तेपर्यंत पोहचवणे हेच कुठल्याही राजकीय पक्षाचे उद्दिष्ट असते. काही प्रमाणात कार्यकर्ते आणि पक्षाचा उत्साह अशाच सत्तेच्या आमिषाने टिकून असतो.

पक्षाच्या मुख्य नेत्याला किंवा संस्थापकाला याची कल्पना देखील असते. पक्षाला दुसर्‍या पक्षात विलीन करण्यात मोठी मानहानी असली तरी युती किंवा आघाडी करून पक्षासाठी संधी शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षप्रमुख करत असतो. कधी तो भविष्याचा विचार करतो तर कधी करतही नाही. तोच विचार आणि तेच टायमिंग शोधण्याची कसरत राज ठाकरे यांना करावी लागणार आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नक्की पुढे काय? हाच संभ्रम सध्या दिसून येत आहे. काही जण तर साहेब टायमिंगच्या शोधात आहेत, असे बोलत आहेत.

First Published on: September 17, 2019 6:37 AM
Exit mobile version