खाईन तर ‘तुपा’शी…नाहीतर उपाशी

खाईन तर ‘तुपा’शी…नाहीतर उपाशी

‘अभिमानी शेतकरी संघटने’ला आतापर्यंत दुहीनं पोखरलं होतं.पक्षाचे सर्वेसर्वा कुट्टी साहेब आणि दादाभाऊ यांच्यात ठिणगी उडाली होती.अखेर दादाभाऊ सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला येऊन बसले.त्यामुळे संघटनेचं बळ विभागलं गेल्याची चर्चा होती.अनेक वर्ष ऊस,कापूस,दूध अशी आंदोलने केल्यानंतर आलेला लोण्याचा गोळा चाखण्याची संधी दादाभाऊंना मिळाली होती.ती त्यांना दवडायची नव्हती. त्यामुळे दादाभाऊंनी सरकारमध्ये उडी मारली. नुसती उडीच नाही मारली स्वत:ची नवी कोरी पार्टी देखील स्थापन केली.हमी भाव मागणारे आता सरकारच्या कामाची हमी देणार्‍यांत जाऊन बसले होते.त्यात अभिमानीला उतरती कळा लागली होती.

स्वत: कुट्टी साहेब लोकसभेला चितपट झाले होते.त्यामुळे त्यांच्याकडे देखील विशेष ताकद आता राहिली नव्हती.जे पेरलं होतं ते उगवल्यावर दुसर्‍यानंच कोणीतरी खाल्ल्यासारखी अवस्था कुट्टीसाहेबांची झाली होती. त्यात पुन्हा निवडणुका आल्या.आता सत्ताधारी पक्षानं नवी मेगाभरती हाती घेतली.ज्यांना ज्यांना लाभार्थी व्हायचंय त्यांची आता रांग लागू लागली. सत्ताधार्‍यांना एव्हाना सत्तेची पाच वर्षे उपभोगली होती.त्यात त्यांनी लोणी,तूप काढण्यात यश मिळवले होते.त्याच्याच आशेने अनेकजण पक्षात देखील आले होते.त्यामुळे शेतकरी जरी रस्त्यावर दिसले तरी त्यांचे नेते मात्र सत्तेच्या खुर्चीच्या जवळ फिरण्यात मश्गुल होते.

आता कोण नवीन सत्ताधार्‍यांना जावून मिळालं तर त्यात नवलं असं काही नव्हतं. त्यामुळे एके दिवशी अभिमानीचे बिनिचे शिलेदार अविकांत धुपकर सत्ताधारी पक्षाला असलेला ‘रयते’चा पाठिंबा बघून ते दादाभाऊंच्या क्रांती संघटनेत गेले.त्यांना तिथे ‘भाव मिळण्याची हमी’ मिळाली होती.त्यामुळेच त्यांनी तेथे उडी मारल्याची चर्चा होती.धुपकर चमचाभर तूप तरी हातात पडेल या आशेवर होते.त्यांनी सुमारे 18 दिवस त्यासाठी वाट पाहिली.परंतु,सत्ताधार्‍यांनी आणि क्रांती संघटनेने त्यांच्या आयुष्यात काही क्रांती केली नाही.त्यांना देखील हमी भाव देण्याच्या आशेवर ताटकळत ठेवण्यात आले.

अखेर त्यांनी पुन्हा एकदा आपला अभिमान जागवत 18 दिवसांत पुन्हा आपल्या अभिमानी संघटनेची कास धरली.सत्तेत जायचं तर काही तरी हाती पडलंच पाहिजे,ही राजकारणाची रितच आहे.आपल्या ढासळेलेल्या संघटनेतून सत्तेच जाण्याचं तेच उद्दिष्ट होतं.परंतु,तसं काही हाती न पडल्यामुळे ‘खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशीच राहीन’हे धुपकरांना करावं लागलं.

First Published on: October 17, 2019 5:03 AM
Exit mobile version