शिवसेनेला दोन मंत्रीपदे ज्यादा द्या; पण लवकर काय ते ठरवा – रामदास आठवले

शिवसेनेला दोन मंत्रीपदे ज्यादा द्या; पण लवकर काय ते ठरवा – रामदास आठवले

रामदास आठवले, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकर

विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील पक्षांना बहुमत मिळून देखील सत्ता स्थापनेचा तिढा मात्र काही सुटत नाही. भाजप आणि शिवसेनेचे नेते रोज नवीन वक्तव्ये करत असल्यामुळे सत्तास्थापनेचा गोंधळ अधिकच वाढत चालला आहे. यामध्ये महायुतीमधील घटकपक्षांची मात्र ओढाताण होत आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपने लवकरात लवकर सत्ता स्थापन करुन घटक पक्षांना एक-एक मंत्रीपद द्यावे अशी मागणी घटक पक्षातील नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष सदाभाऊ खोत या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

शिवसेनेला दोन मंत्रीपदे अधिक द्या

२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने ६३ जागांवर तर भाजपने १२२ जागांवर विजय मिळवला होता. यावेळी देखील अपक्षांना सोबत घेऊन शिवसेना ६३ तर भाजप जवळपास १२० जागांवर पोहोचली आहे. त्यामुळे यावेळी देखील शिवसेनेपेक्षा दुप्पट जागा भाजपकडे आहेत. मागच्यावेळेस शिवसेनेला १३ मंत्रीपदे देण्यात आली होती. यावेळी दोन जादा मंत्रीपदे त्यांना द्यावीत, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

घटक पक्षांना कुठलंही मंत्रीपद द्या

यासोबतच चार घटक पक्षांना चार मंत्रीपदे मिळावीत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. आरपीआयला कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, असे आठवले म्हणाले. मात्र कॅबिनेट मंत्रीपदावर अडून राहिलो तर काहीच भेटणार नाही. त्यामुळे आम्हाला राज्यमंत्री पदही चालेल, मात्र प्रत्येक घटक पक्षाला मंत्रीपद मिळावेच, यावर घटक पक्षांचे एकमत झाल्याचेही आठवले म्हणाले.

First Published on: October 31, 2019 12:50 PM
Exit mobile version