विरोधकच उरले नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्या २२५ सभा

विरोधकच उरले नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्या २२५ सभा

देवेंद्र फडणवीस

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता थंडावला असून २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दोन आठवड्या दरम्यान प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासूनच आम्हाला विरोधकच उरले नाहीत, असे सांगत होते. मात्र दुसऱ्या बाजुला त्यांनी सर्वाधिक सभा घेत जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून मुख्यमंत्र्यांनी एकूण ६५ सभा घेतल्या, तर त्यापूर्वी महिनाभरातील महाजनादेश यात्रेदरम्यान सुमारे १६० सभा अशा एकूण २२५ सभा मुख्यमंत्र्यांनी घेतल्या असल्याचे त्यांच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे.

निवडणुकीच्या सुरुवातीपासून आमच्याशी कुस्ती करायला समोर कुणीही पैलवान नाही, अशी दर्पोक्ती मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र विरोधकांपेक्षा जोरदार प्रचार करण्यात भाजपच वरचढ राहिले. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रात एकही सभा घेतली नाही. तर आघाडीच्या पक्षांची एकही संयुक्त सभा झाली नाही. तसेच राहुल गांधी यांनी काँग्रेससाठी अगदी मोजक्या मतदारसंघात सभा घेतल्या. बाकी काँग्रसेचे नेते आपापल्या मतदारसंघातच व्यस्त दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र प्रचारात चागंली आघाडी घेतली होती. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार स्वतः दिवसाला तीन तीन सभा घेत राज्यभर फिरले. तसेच खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार खासदार डॉ. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी आणि इतर नेत्यांनी आपापल्या पद्धतीने प्रचार केला.

मुख्यमंत्री कार्यालयातून दिलेल्या प्रेस नोटमध्येच मुख्यमंत्र्यांच्या सभांचा आकडा देण्यात आलेला आहे. “निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच सुमारे १४४ मतदारसंघ मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून पिंजून काढले होते. प्रामुख्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या तुलनेत किती प्रचंड काम या पाच वर्षांच्या काळात झाले, यावर या संपूर्ण प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांचा भर राहिला. या काळात विविध ठिकाणी अनेक नेत्यांच्या सुमारे ४५ पत्रपरिषदांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.”, असे या नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

भाजपच्या अन्य नेत्यांच्या सभा

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी : ९ सभा

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह : १० सभा

कार्यकारी अध्यक्ष श्री जे. पी. नड्डाजी : ७ सभा

श्री राजनाथ सिंहजी : ३ सभा

श्री नितीन गडकरी : ३५ सभा

उ.प्र. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ : १० सभा

कर्नाटक मुख्यमंत्री येदियुरप्पा : ८ सभा

गुजरात मुख्यमंत्री श्री विजय रूपाणी : ४ सभा

श्री चंद्रकांत पाटील : १० सभा

स्मृति इराणी : १४ सभा

पंकजा मुंडे : १८ सभा

रावसाहेब दानवे : ११ सभा

साध्वी निरंजन ज्योती : ६ सभा

फग्गनसिंग कुलस्ते : ४ सभा

केशवप्रसाद मौर्य : ३ सभा

सुधीर मुनगंटीवार : ६ सभा

मनोज तिवारी : ८ सभा

जी. किशन रेड्डी : ३ सभा

गुलाबचंद कटारिया : ९ सभा

रामदास आठवले : ५ सभा

शाहनवाज हुसेन : ४ सभा

चित्रा वाघ : १६ सभा

नाहीदा शेख : ९ सभा

First Published on: October 19, 2019 10:16 PM
Exit mobile version