विधानसभा मतदान : कुलाब्यात महिलांची बाजी

विधानसभा मतदान : कुलाब्यात महिलांची बाजी

विधानसभा मतदान : कुलाब्यात महिलांची बाजी

विधानसभा निवडणुकांसाठी २१ ऑक्टोबर रोजी राज्यातल्या २८८ मतदारसंघात मतदान झाले. मतदान झाल्यानंतर अंतिम आकडेवारीनुसार राज्यातल्या एकूण मतदानाची आकडेवारी ६१.१३ टक्क्यांवरच अडकली आहे. २०१४मध्ये ही आकडेवारी ६३.०८ टक्के इतकी होती. दरम्यान, मुंबईसाठी विचार करायचा झाल्यास, मुंबईत मतांचा टक्का खाली आला असला तरी मात्र, यंदा कुलाबा मतदार संघात महिलांनी बाजी मारल्याचे समोर आले आहे. पुरुषांच्या टक्केवारीपेक्षा महिलांची टक्केवारी अधिक आहे. लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघासाठीच्या मतदानातही कुलाब्यातील महिलांचे मतदान अधिक होते. त्यामुळे यावेळीही त्याचीच पुरावृत्ती झाली आहे.

यंदाच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी

कुलाबा विधानसभा मतदारसंघात महिलांच्या मतदानाची टक्केवारी ४१.०९, तर पुरुष मतदारांची टक्केवारी ३९.४० आहे. तर यंदा झालेल्या लोकसभेच्यावेळी देखील येथील महिलांची टक्केवारी ४७.६९, तर पुरुष मतदारांची टक्केवारी ४३.३४ होती. या निवडणुकीत जरी आकडेवारी कमी झाली असली तरी महिलांनीच अधिक प्रमाणात मतदान केल्याचे समोर आले आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघात पुरुषांची बाजी

लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिण मुंबईतीलच वरळी विधानसभा मतदारसंघातही महिलांनीच बाजी मारली होती. पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची टक्केवारी ०.१५ टक्क्यांनी अधिक होती. मात्र, यंदाच्या विधानसभेला पुरुषांनी बाजी मारली आहे. यंदा पुरुष आणि महिलांच्या टक्केवारीत जवळपास दोन टक्क्यांचा फरक असून पुरुषांचे मतदान महिलांपेक्षा अधिक आहे, तर सायन कोळीवाड्यात पुरुष आणि महिला मतांची टक्केवारी मतदान जवळपास सारखीच असल्याचे समोर आले आहे.

मुंबई शहारातील टक्केवारी

मतदार संघ               पुरुष                 महिला

धारावी                    ४७.६७              ४७.३८
सायन कोळीवाडा        ५१.८०               ४८.६५
वडाळा                   ५५.७३               ५०.३८
माहीम                     ५४.९३              ५०.१८
वरळी                     ४८.८८               ४६.८७
शिवडी                    ५०.६५               ४७.५७
भायखळा                  ५२.१६               ४८.९६
मलबार हिल              ४९.१५                ४४.५४
मुंबादेवी                   ४५.७९              ४२.५८
कुलाबा                    ३९.४०               ४१.०९
एकूण                      ४९.२८              ४६.७८

विधानसभेसाठी राज्यात ६१.१३ टक्के मतदान

विधानसभेसाठी राज्यातल्या २८८ मतदारसंघात मतदान झाले असून यंदाच्या निवडणुकीत राज्यात ६१.१३ टक्के मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे. तसेच सातारा पोटनिवडुकीसाठी ६७.१५ टक्के मतदान झाले आहे. राज्यात ४ कोटी ६८ लाख ६५ हजार ३८५ पुरुष, ४ कोटी २८ लाख ३५ हजार ३७४ स्त्रिया आणि २ हजार ६३७ तृतीयपंथी अशा एकूण ८ कोटी ९७ लाख ३ हजार ३९६ मतदारांपैकी एकूण ५ कोटी ४८ लाख ३८ हजार ५१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.


हेही वाचा – मोठा भाऊ भाजपकडून सेनेला सत्तेत छोटाच वाटा!


 

First Published on: October 23, 2019 10:54 AM
Exit mobile version