२१ तारखेपर्यंत तरी सत्ताधाऱ्यांना संध्याकाळी भेटू नका; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

२१ तारखेपर्यंत तरी सत्ताधाऱ्यांना संध्याकाळी भेटू नका; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार

“राजकारणात काम करत असताना आपले विरोधकांसोबत संबंध येतात. मात्र निवडणुकीच्या काळात सत्ताधारी विरोधकांची भेट घेणे टाळावे. निदान २१ ऑक्टोबरला मतदान होईपर्यंत तरी सत्ताधाऱ्यांना संध्याकाळी भेटू नका”, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हडपसर येथे बोलताना केले. चेतन विठ्ठल तुपे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेला ते संबोधित करत होते. “आज सोशल मीडिया मजबूत झाला असून तुम्ही जर विरोधकांना भेटलात तर तात्काळ त्याचे फोटो काढून व्हायरल केले जातात आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांची भेट टाळाच”, असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे.

अजित पवार म्हणाले की, “निवडणुकीच्या काळात गैरसमज पसरवला जातो. कधीकधी जुने फोटो उकरुन काढले जातात. आपण काँग्रेससोबत आघाडी केलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही सत्ताधाऱ्यांना भेटलात तर आघाडीतील पक्षांनाही तोंड द्यावे लागणार आहे. दोन जादा मत नाही मिळवता आले तरी चालेल, मात्र आहे ती मते तरी घालवू नका. एवढे केले तरी शरद पवार तुम्हाला धन्यवाद देतील”, अशी कळकळीची विनंतीच अजित पवार यांनी केली.

नोटीसा आल्या तरी घाबरू नका

सत्ताधाऱ्यांकडून सध्या विरोधकांना टार्गेट करण्यात येत आहे. शरद पवारांसारख्या नेत्यांना ईडीने नोटीस पाठवली म्हटल्यावर तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. कार्यकर्त्यांना घाबरवण्यासाठी किंवा नाउमेद करण्यासाठी सत्ताधारी दबाव निर्माण करतील तरीही कार्यकर्त्यांनी कोणत्याही नोटीशीला न घाबरता काम करत रहावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

First Published on: October 9, 2019 2:44 PM
Exit mobile version