देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका करणारी पहिली फेसबुक पोस्ट!

देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका करणारी पहिली फेसबुक पोस्ट!

देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेतेपदाचे प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली खरी. पण त्यानंतर त्यांनी सरकारवर टीका करायला सुरूवात केली. शेतकरी मदतीच्या आश्वासनाची आठवण करून दिल्यानंतर आता माजी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाची भूमिका पहिल्या दिवसापासूनच निभावायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंचा शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या फेसबुकवर नव्या सरकारला सुनावणारी पोस्ट टाकली आहे. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना टार्गेट केलं आहे.

काय आहे या पोस्टमध्ये?

या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपून-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल? यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी? ‬‪या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? ‬‪नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? ‬‪स्वतच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? ‪अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का?‬ ‪भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? ‬‪महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे!’


हेही वाचा – पदांच्या वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद?

पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत २० कोटींना मंजुरी

शपथविधी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कॅबिनेटची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये रायगड संवर्धनासाठीच्या ६०० कोटींपैकी २० कोटींच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. तसेच, राज्यपालांनी ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिलेले असताना लवकरात लवकर बहुमत सिद्ध करण्याच्या प्रयत्नात नवे सरकार असणार आहे. बहुमत सिद्ध केल्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पूर्णवेळ विधानसभा अध्यक्षांची निवड राज्य सरकारला करता येणार आहे.

First Published on: November 29, 2019 10:53 AM
Exit mobile version