मंदा म्हात्रेंना भाजपचे तिकीट; गणेश नाईकांनी बोलावली नगरसेवकांची बैठक

मंदा म्हात्रेंना भाजपचे तिकीट; गणेश नाईकांनी बोलावली नगरसेवकांची बैठक

नवी मुंबईतील राजकारणावर पकड असलेल्या गणेश नाईक यांना भाजपने उमेदवारी डावलली आहे. बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी इच्छा नाईक यांनी पक्षश्रेंष्ठीकडे व्यक्त केली होती. मात्र भाजपने पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांनाच संधी दिली. त्यामुळे नाईक यांचे कार्यकर्ते नाराज झाले असून नवी मुंबईचे महापौर आणि नगरसेवकांची नाईक यांनी बैठक बोलावली असल्याचे समजते. या बैठकीनंतर नाईक आपली पुढील रणनीती ठरवणार आहेत. काल (दि. १ ऑक्टोबर) भाजपने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसहीत नाईक यांना देखील डावलण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्या फळीतील नेते म्हणून गणेश नाईक यांचा उल्लेख केला जात असे. मात्र भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच कार्यक्रमात नाईक यांना व्यासपीठावर जागा मिळाली नव्हती. गडकरी रंगायतनमधून भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या कार्यक्रमातून त्यांना काढता पाय घ्यावा लागला होता. तर त्याच कार्यक्रमात विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांना मात्र व्यासपीठावर जागा मिळाली होती. या अपमानानंतर आता तिकीट नाकारल्यामुळे नाईक यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

 

First Published on: October 2, 2019 12:45 PM
Exit mobile version